भीषण आगीत भंगार दुकान जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:13 PM2018-05-22T23:13:51+5:302018-05-22T23:14:08+5:30
तालुक्यातील बामणी (दु) येथील भर वस्तीत असलेल्या भंगार दुकानाला आग लागली. या आगीत भंगार दुकान जळून खाक झाले. या आगीमुळे शेजारील तीन घरांनाही आग लागली. मात्र चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : तालुक्यातील बामणी (दु) येथील भर वस्तीत असलेल्या भंगार दुकानाला आग लागली. या आगीत भंगार दुकान जळून खाक झाले. या आगीमुळे शेजारील तीन घरांनाही आग लागली. मात्र चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
बामणी (दु) येथे जावेद खान यांचे पंधरा वर्षांपासून भंगार दुकान आहे. भंगार परिसरात प्लास्टीक सामान, लोखंडी, खर्डे, टायर गच्च भरून होते. येथील कागार गॅस सिलिंंडरच्या सहाय्याने लोखंड कापण्याचे काम करीत होते. यामुळेच आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग लागताच तेथील मजुर पळत बाहेर आले, तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले.
आगीचे व धुराचे लोळ आकाशात पसरू लागले. लोखंड कापण्यासाठी वापरात येणारे १०-१२ सिलिंडर त्यात होते. यात सिलिंडरचा स्फोट झाला आणि बामणी गाव दणाणून गेले. दुकानाच्या शेजारी असलेल्या तुळशिराम निखाडे, उज्ज्वला मानकर, बाबुराव जिवतोडे, पुंडलिक गावंडे यांच्या घरांनाही आगीची किरकोळ झड पोहचली. आगीची वार्ता बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना मिळताच घटनास्थळावर तहसीलदार विकास अहिर, मंडळ निरीक्षक दिलीप बोडखे यांच्यासह ते दाखल झाले. तसेच बल्लारपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल मलीक, पीएसआय संतोष जाधव आपल्या ताफ्यासह पोहचले.
आग आटोक्यात आणण्यासाठी राजुरा नगर परिषद, बल्लारपूर नगर परिषद, पेपर मिल बल्लारपूर, नगर परिषद मूल, अंबुजा सिमेंट कंपनी, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, नगर परिषद गडचांदूर, महानगरपालिका चंद्रपूर व माणिकगड सिमेंड कंपनीच्या अग्नीशमन गाड्या बोलाविण्यात आल्या. तब्बल चार तास परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
बामणी प्रोटीन्सचे व्यवस्थापक सतीश मिश्रा यांनी आग विझविण्यासाठी पाण्याची व्यवस्था व फॅक्टरी बंद करून कामगारांना मदतीसाठी पाठविले. बामणीचे सरपंच सुभाष ताजणे, उपसरपंच जमील शेख यांनीही तत्परता दाखवून सर्व कार्यालयांना माहिती दिली. बल्लारपूर तहसीलचे सर्व कर्मचारी, पटवारी तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी आग विझविण्यात व जनतेला नियंत्रीत करण्यास मदत केली. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती.
बामणी येथे भंगार दुकानाला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळावर आग विझविण्यासाठी सर्व यंत्रणेला कामी लावून आगीवर चार तासानंतर नियंत्रण मिळविले. आग लागण्याचे कारण तपासाअंती व चौकशीनंतर समजणार. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. आगीत भंगार दुकानाचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने जिवित हानी झाली नाही.
- क्रांती डोंबे,
उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर
आगीची बातमी समजताच घटनास्थळावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. जमावाला नियंत्रित करण्यात आले. आगीच्या नुकसानीबाबत नुकसानग्रस्तांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर व तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- अब्दुल सलीम,
सहा. पोलीस निरीक्षक, बल्लारपूर.