रेल्वे फाटकातून धोकादायक वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 06:00 AM2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:39+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात पोंभूर्णा, गोंडपिपरी, जिवती व सावली तालुका सोडला तर सर्वच ठिकाणी रेल्वेचे जाळे पसरले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे फाटक लावले आहेत. तर काही रेल्वे क्रासींग मानवरहित आहेत. चंद्रपुरात बाबुपेठ रेल्वे फाटक अलिकडे असेच धोकादायक झाले आहे. एकाच ठिकाणी एक्सप्रेस व बीएनआर रेल्वे लाईनचे दोन फाटक आहेत. दिवसातून अनेकदा हे फाटक बंद राहत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

Dangerous traffic from the train gates | रेल्वे फाटकातून धोकादायक वाहतूक

रेल्वे फाटकातून धोकादायक वाहतूक

Next
ठळक मुद्देदुर्लक्षच घेताहेत बळी : मानवरहित रेल्वे क्रॉसिंगही धोक्याचेच

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दळणवळणाचे अनेक साधने आहेत. असे असले तरी रस्त्यावरून वाहतूक करण्यास रेल्वेला प्रथम प्राधान्य देण्यात येते. मात्र रेल्वे फाटक बंद असतानाही वाहनधारकांची बंद फाटकातून धोकादायक वाहतूक सुरू आहे. यात अनेकांचे बळी गेले आहेत. तरी हा प्रकार थांबलेला नाही. याशिवाय जिल्ह्यात असलेल्या मानवरहित रेल्वे क्रासींगही धोक्याचेच ठरत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पोंभूर्णा, गोंडपिपरी, जिवती व सावली तालुका सोडला तर सर्वच ठिकाणी रेल्वेचे जाळे पसरले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे फाटक लावले आहेत. तर काही रेल्वे क्रासींग मानवरहित आहेत. चंद्रपुरात बाबुपेठ रेल्वे फाटक अलिकडे असेच धोकादायक झाले आहे. एकाच ठिकाणी एक्सप्रेस व बीएनआर रेल्वे लाईनचे दोन फाटक आहेत. दिवसातून अनेकदा हे फाटक बंद राहत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या त्रासातूनच अनेक वाहनधारक फाटक बंद असतानाही लोखंडा रॉङखालून आपली दुचाकी वाहने काढून पुढे जातात. एका वाहनधारकाने हा प्रकार केला की लगेच दुसरा करतो, मग तिसरा, चौथा, अगदी भरधाव रेल्वे जवळ येईपर्यंत हा प्रकार सुरूच असतो. या धोकादायक प्रकार बाबुपेठमध्ये अनेकदा अंगलट आला आहे. आता या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवसात येथील समस्या सूटणार आहे.
वरोरा तालुक्यात चैन्नई- नवीदिल्ली रेल्वे मार्ग जातो. ही रेल्वे लाईन रेल्वे गाड्यांच्या अवागमनाने नेहमी व्यस्त असते. या रेल्वे लाईनवर मोहबाळा, डोंगरगाव (रे.), नागरी या गावाजवळ रेल्वे गेट आहे. यातील डोंगरगाव व नागरी या रेल्वे गेटवरही वाहनधारकांकडून हाच कित्ता गिरवला जातो. गेट बंद असताना येथूनही वाहने कसरत करीत काढली जातात. मूल, सिंदेवाही, राजोली, मारडा, कोंढा, ताडाळी, राजुरा, नागभीड, भद्रावती या तालुक्यातही बंद रेल्वे फाटकातून अव्याहतपणे वाहनांची वाहतूक सुरू राहते. उंच असलेले ट्रक व क्षमतेपेक्षा अधिक भार वाहणारे ट्रक रेल्वे लाईनमध्ये अडून धोका होण्याची शक्यता मोहबाळा रेल्वे गेटवर अधिक आहे.
या गेटमधून औद्योगिक वसाहतीमधील उद्योगात ट्रक जात असतात. जिल्ह्यात नागभीड, भद्रावती, वरोरा व चंद्रपूर तालुक्यात अनेक ठिकाणी मानवरहित रेल्वे क्रासींग आहेत. गडचांदूर परिसरातील कुट्रा व नागभीड तालुक्यातील अड्याळ टेकडी रेल्वे क्रासींग प्रचंड धोकादायक आहे.

दरवाजाचे फाटक होऊ शकतो उपाय
साधारणत: लोखंडी रॉड खाली पाडून फाटक बंद केले जाते. त्यामुळे या रॉडखालून वाहनधारक आपल्या गाड्या काढण्याचे अनाठायी धाडस करतात. याऐवजी अशा रेल्वे क्रासींगवर दोन दरवाजाचे गेट बसविले तर तिथून वाहन काढणे वाहनधारकांना शक्य होणार नाही .

उपस्थित कर्मचाऱ्यांना देणेघेणे नाही
चंद्रपुरातील बाबपुठे फाटक असो की जिल्ह्यातील कुठलाही रेल्वे फाटक असो. तिथे २४ तास कर्मचारी तैनात असतो. या कर्मचाºयाच्या डोळ्यादेखत बंद फाटकातून वाहनधारक धोकादायक क्रासींग करतात. मात्र कर्मचाऱ्यांकडून त्यांना साधे हटकलेही जात नाही. जणू त्यांना त्याचे काही देणेघेणेच नसावे.

Web Title: Dangerous traffic from the train gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.