जंगली जनावरांनी केले पीक उद्ध्वस्त
By admin | Published: May 7, 2017 12:33 AM2017-05-07T00:33:49+5:302017-05-07T00:33:49+5:30
मूल तालुक्यातील मारोडा परिसरातील शिवापूर चक येथे सर्व्हे नं. २४४ मध्ये जंगलाला लागून किरण विठ्ठलराव पोरेड्डीवार यांचे धानपीक शेवटच्या टप्प्यात म्हणजे .....
धान पीक नष्ट : वन विभागाकडे नुकसानभरपाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : मूल तालुक्यातील मारोडा परिसरातील शिवापूर चक येथे सर्व्हे नं. २४४ मध्ये जंगलाला लागून किरण विठ्ठलराव पोरेड्डीवार यांचे धानपीक शेवटच्या टप्प्यात म्हणजे जवळपास धानाचा निसवापूर्ण होत असताना शेती भोवती पूर्ण कुंपण केले असतानासुद्धा अचानक रात्री जंगली रान म्हशींनी पिकावर हल्ला चढविला आणि एका रात्रीतून पूर्ण धानपीक फस्त केले.
पोरेड्डीवार यांच्या मालकीचे २.९ हे.आर. शेत असून त्यापैकी १.२० हे. आर. जागेमध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली. मोठ्या कष्टाने सिंचनाची सोय करून आपल्याला शेतीमधून फायदा होईल या दृष्टिकोनातून शेतात विहीर बांधली. विहिरीला पाणी भरपूर असल्याने त्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली. दुसऱ्या दिवशी त्यांना शेतात फक्त धानाचे खुतवे दृष्टीस पडले. त्यामुळे शेतकऱ्यांची आतापर्यंत केलेली मेहनत व खर्च केलेला पैसा पूर्णत: वाया गेला. त्यांचे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे.
एकीकडे वन विभागाच्या जाचक अटी व वन्यप्राण्यांच्या हत्येवर बंदी असल्यामुळे जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यांना मुबलक प्रमाणात चारा मिळत नसल्यामुळे ते पिकांवर हल्ला करीत असून त्यांचा बंदोबस्त करण्यात शेतकरी अपयशी ठरत आहेत. त्याची झळ सामान्य शेतकऱ्याला सोसावी लागत आहे.
या आधीही पावसाळी धानपिकाचीसुद्धा अशीच नासाडी केली होती. तेव्हा फक्त त्यांना सात हजार रुपये मिळाले. नुकसान लाख ते दीड लाखाचे आणि मदत सात हजारांची ? कसा जगेल शेतकरी ? वन विभागानी नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या धान पिकाची पाहणी करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहे.