आयटीआयमध्ये दारुड्यांचा धिंगाणा
By admin | Published: October 1, 2015 01:25 AM2015-10-01T01:25:03+5:302015-10-01T01:25:03+5:30
येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत कुणीही नसल्याची संधी साधत दारूड्यांनी धिंगाणा घातला व दोन कोटी रूपयांच्या शैक्षणिक साहित्याची नासधुस केली.
राजुरा येथील प्रकार : शैक्षणिक साहित्याची नासधूस, प्राचार्यांची पोलिसांत तक्रार
राजुरा : येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत कुणीही नसल्याची संधी साधत दारूड्यांनी धिंगाणा घातला व दोन कोटी रूपयांच्या शैक्षणिक साहित्याची नासधुस केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. दारुड्यानी आयटीआयमधील काचा फोडून दारुच्या बाटल्या वर्ग खोल्यात टाकल्या. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुभाष पेदापल्लीवार यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राजुरा येथील आयटीआय शहराच्या शेवटच्या टोकावर आहे. औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत दारूड्यांनी धिंगाणा घालणे हा प्रकार काही नवीन नसून यापूर्वीसुद्धा असाच प्रकार घडला आहे. मंगळवारच्या रात्री काही दारूड्यांनी औद्योगीक संस्थेच्या परिसरात दारू पिण्यासाठी प्रवेश केला. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत आयटीआयमधील आठ ते दहा दरवाज्यांच्या काचा फोडल्या. यात लाखो रूपये किमंत असलेल्या शैक्षणिक मशीनचे मोठे नुकसान झाले.
येथील आयटीआयमध्ये करोडो रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य असून या ठिकाणी चोराचा धुमाकूळ होता की दारुड्याचा, हेच कळायला मार्ग नाही. त्यामुये पोलिसांनी यावर तातडीने उपाययोजना करून दारूड्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)