एकोणा खाणीसाठी ‘तारीख पे तारीख’
By admin | Published: April 4, 2015 12:27 AM2015-04-04T00:27:23+5:302015-04-04T00:27:23+5:30
वेकोलिच्या वतीने वरोरा तालुक्यातील एकोणा गावाच्या शिवारात खुली कोळसा खाण प्रस्तावित आहे.
अनुदान अडले : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांत असंतोष
वरोरा : वेकोलिच्या वतीने वरोरा तालुक्यातील एकोणा गावाच्या शिवारात खुली कोळसा खाण प्रस्तावित आहे. ही कोळसा खाण सुरू करण्याच्या हालचाली सन २००४ पासून सुरू आहेत. आजपर्यंत सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहे. मात्र असे असतानाही कोळसा खाण सुरू करण्याकरिता वेकोलि प्रशासन तारीख पे तारीख देत असल्याने प्रकल्पग्रस्तांचे सर्वच कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष खदखदत आहे.
एकोणा परिसरात वेकोलिच्या वतीने दोन खुल्या कोळसा खाणी सुरू करण्यात येणार आहेत. याकरिता एकोणा, मारडा, वनोजा व चरुर खटी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याची प्रक्रिया वेकोलिने सन २००४ पासून सुरू केली आहे. यामध्ये शेकडो हेक्टर जमिनी जाणार आहे.
सध्या वेकोलिने एकोणा क्रमांक दोन ही खाण सुरू करण्याकरिता शेतकऱ्यांकडून दोन वर्षापूर्वी नोटरी व नोकरीचे अर्जही भरुन घेतले. त्यातच आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात रकम जमा झालेली नाही व खाण मार्च २०१४ मध्ये सुरू करण्याची घोषणा वेकोलिच्या वतीने करण्यात आली. परंतु, मार्च महिनाही संपला असून अद्यापही खाण सुरू करण्याच्या हालचाली वेकोलिच्या वतीने झालेल्या नाही.
काही दिवसांनंतर पीक पेरणीची लगबग सुरू होणार असून शेतकऱ्यांना बियाणे घ्यावे लागणार आहे. परंतु शेतजमिनीचे सोपस्कार वेकोलिने केल्याने शेतकऱ्यांना बँक कर्ज देत नाही व वेकालि खाण सुरु करुन शेतकऱ्यांना पैसे देत नाही. मग कर्ज घ्यायचे तर कोणाकडून अशा द्विधा मनस्थितीत एकोणा परिसरातील शेतकरी अडकले आहेत. अनेकांचे पाल्य उच्च शिक्षणासाठी बाहेर गावात आहेत. मात्र बँकेकडून कर्ज मिळत नाही व जवळ पैसा नाही, त्यामुळे पाल्यांचे शिक्षण अर्ध्यावर राहण्याची शक्यता अनेक पालकांनी व्यक्त केली. अनेक प्रकल्पग्रस्तांनी नोकरी करीता अर्ज केले. (तालुका प्रतिनिधी)
विवाह कार्य लांबणीवर
या परिसरातील युवक व युवती बोहल्यावर चढण्याची वाट बघत आहेत. वेकोलि प्रशासन तारखेवर तारीख देत असल्याने त्यांचा आधार धरुन पालक आपल्या मुलामुलींचा विवाह ठरवीत आहे. परंतु, रकम हाती येत नसल्याने विवाह लांबणीवर टाकण्यात येत आहे. तर काहींचे विवाह मोडल्याचेही येथील नागरिक सांगतात.
वेकोलि प्रशासन खाण सुरू करण्याकरिता मागील काही वर्षांपासून तारखेवर तारीख देत आहे. मोबदला दिला नाही त्यामुळे प्रकल्पग्रस्त संकटात सापडले आहेत. वारंवार मोर्चे काढले, निवेदने दिली मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता फक्त आत्मदहन हाच एक पर्याय आमच्याजवळ शिल्लक आहे.
- गणेश चवले
उपसरपंच, एकोणा