दुर्मिळ इजिप्शीयन गिधाडांचा सावली तालुक्यात वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 11:31 PM2017-07-30T23:31:27+5:302017-07-30T23:32:03+5:30
अन्नसाखळी निर्माण होण्यासाठी ज्या-ज्या पक्षी आणि प्राण्यांची भुतलावर आवश्यकता आहे.
उदय गडकरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : अन्नसाखळी निर्माण होण्यासाठी ज्या-ज्या पक्षी आणि प्राण्यांची भुतलावर आवश्यकता आहे. त्यापैकी अनेक वन्यप्राणी व पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात गिधाड हा पक्षी अतिशय दूर्मिळ झाला असतानाच इजीप्शीयन गिधाड नावाचा दूर्मिळ पक्षी सावली तालुक्यातील कोंडेखल येथे आढळून आला आहे.
वर्षभरापूर्वी सावली वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातंर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवनक्षेत्रातील पेठगाव, भान्सी परिसरात गिधाडांच्या संवर्धनासाठी खानावळ तयार करण्यात आली होती. सहा महिन्याच्या प्रयत्नानंतर त्याची फलश्रुती म्हणून २५ गिधाडांचा थवा त्या परिसरात आढळून आला होता. या मौसमात अत्यंत दूर्मिळ समजला जाणारा इजीप्शीयन गिधाड हा पक्षी या परिसरात आढळून आला आहे. त्या पक्षाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वनविभागाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. चंद्रपूरचे तत्कालिन मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी विशेष रूची दाखवून गिधाड संवर्धनासाठी सावली तालुक्यात गिधाड खानावळ तयार करण्याचा उपक्रम राबविला होता. मात्र त्यांची बदली झाल्याने सदर उपक्रम थंडबस्त्यात पडला आहे.
सावली तालुक्यातील कोंडेखल येथील नालीमध्ये सर्पगरूड नावाचा पक्षी पडुन असल्याची माहिती शिर्सीचे वनरक्षक शंकर देठेकर यांना गावकºयांनी दिली. लागलीच त्यांनी कोंडेखल येथे जाऊन त्या पक्ष्याला सावली येथील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात आणले. त्याची योग्य सुश्रुषा केल्यानंतर त्या पक्ष्याला सोडून देण्यात आले. दरम्यान, सदर पक्ष्याची ओळख पटविण्यासाठी गुगल सर्च करून हा पक्षी इजीप्शीयन गिधाड असल्याचे निष्पन्न झाले. सदर पक्षी बालावस्थेत असल्यामुळे त्याला उडण्यास अडचण होत होती, हे विशेष. तसेच कोणतेही पक्षी समुहाने स्थलांतर करीत असल्यामुळे या पक्षासोबतच गिधाडांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वनविभागाने याची वेळीच दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे.
स्वच्छता दुताचे रक्षण करावे
नामशेष होत असलेल्या गिधाड प्रजातींचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वनविभागाने मागच्या वर्षी गिधाड खानावळ सुरू केली होती. त्यात यशही आले. २५ गिधाडांची सावली तालुक्यात नोंद करण्यात आली. त्याचा पाठपुरावा दरवर्षी केल्यास गिधाडांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे अनेक पक्षीप्रेमींचे मत आहे. भारतीय गिधाडांसोबतच बाहेरदेशातील गिधाडेही या परिसरात स्थलांतरित झाली असल्याची शक्यता आढळून आलेल्या इजीप्शीयन गिधाडावरून वनविभागाने व्यक्त केली आहे. नामशेष होत असलेल्या गिधाडांचे संवर्धन ही वनविभागासमोर मोठी समस्या आहे. नैसर्गीक अन्नसाखळी कायम राखण्यासाठी गिधाड हा पक्षी महत्त्वाचा समजला जातो. शिवाय स्वच्छता दूत म्हणूनही या पक्ष्याला वनविभागात संबोधले जाते. त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन गिधाड संवर्धनाचा उपक्रम अविरत चालू ठेवावा, अशी मागणी पक्षीप्रेमींकडून केली जात आहे.