दावोस करार: २० हजार कोटींचा प्रकल्प कसा उभारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 06:29 AM2023-01-21T06:29:36+5:302023-01-21T06:31:33+5:30

१.५४ कोटींचे भांडवल, ना तंत्रज्ञान, ना सामग्री; शून्य अनुभव

Davos Agreement: How to set up a 20 thousand crore project? | दावोस करार: २० हजार कोटींचा प्रकल्प कसा उभारणार?

दावोस करार: २० हजार कोटींचा प्रकल्प कसा उभारणार?

Next

अरुणकुमार सहाय

लोकमत न्यूज नेटवर्क, चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती एमआयडीसी येथे कोल गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्यासाठी न्यू इरा क्लिनटेक सोल्युशन कंपनीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वीत्झर्लंडच्या दावोसमध्ये सामंजस्य करार झाला. हा प्रकल्प उभारण्यासाठी २० हजार कोटी रुपयांचे भांडवल लागणार आहे; परंतु न्यू इरा कंपनीकडे या प्रकल्पाकरिता आवश्यक तंत्रज्ञान व पुरेसे भांडवल नाही, तसेच कंपनी केवळ सात महिने जुनी आहे. त्यामुळे कंपनी हा प्रकल्प कसा उभारणार, असा प्रश्न आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत हा करार झाला आहे. ही कंपनी अमेरिकेची असल्याचे सांगितले जात आहे; परंतु ही कंपनी अमेरिकन नसून महाराष्ट्रातील इटखेडा (औरंगाबाद) येथील आहे. कंपनीची नोंदणी २ जून २०२२ रोजी झाली आहे. मालकाने ३ कोटी रुपये गुंतविले आहेत तर, समभाग विक्रीतून १ कोटी ५४ लाख रुपये मिळविण्यात आले आहेत. 

काँग्रेस खासदारांनी घेतले प्रकल्पाचे श्रेय

  • चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर व त्यांच्या आमदार पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी कंपनीची पूर्ण माहिती न मिळविताच या प्रकल्पाचे श्रेय घेतले, तसेच शरद पवार यांनाही प्रकल्पाचे श्रेय दिले. 
  • यासंदर्भात धानोरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

 

काेणती बॅंक देईल कर्ज?

अवघे साडेचार कोटी भांडवल असलेल्या कंपनीला कोणती बँक २० हजार कोटी रुपये देईल, हा प्रश्न आहे. कंपनी खनिकर्म व उत्खननाचे काम करत असल्याची माहिती आहे. कंपनीकडे कोल गॅसिफिकेशनचे तंत्रज्ञान नसल्याचे स्पष्ट होते.

याच प्रकल्पामुळे अहिर यांचा पराभव

आठ वर्षांपूर्वी चंद्रपूरचे तत्कालीन भाजप खासदार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भद्रावती येथे कोल गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्याचे वचन दिले होते; परंतु त्यांनी ते वचन पूर्ण केले नाही. त्याचा फटका त्यांना बसला. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

दावोस येथे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी तीन विदेशी कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले आहेत. त्यापैकी भद्रावती येथील कोल गॅसिफिकेशन प्रकल्पाचा करार सर्वांत मोठा आहे.

Web Title: Davos Agreement: How to set up a 20 thousand crore project?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.