क्रांतीच्या ज्वाळातून उगवली स्वातंत्र्याची पहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 12:46 AM2019-08-15T00:46:07+5:302019-08-15T00:47:13+5:30
८ आॅगस्ट १९४२ ला गवालिया टँक मैदान मुंबई येथे भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधीजींनी ‘करा अथवा मरा’ हा नारा दिला. गांधीजींच्या या संदेशाने देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. चिमूर शहरातील क्रांतिकारक व नागरिकांनी १२ आॅगस्ट १९४२ पासून गुप्त बैठका घेऊन जनजागृती करून स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले.
राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : ८ आॅगस्ट १९४२ ला गवालिया टँक मैदान मुंबई येथे भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधीजींनी ‘करा अथवा मरा’ हा नारा दिला. गांधीजींच्या या संदेशाने देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. चिमूर शहरातील क्रांतिकारक व नागरिकांनी १२ आॅगस्ट १९४२ पासून गुप्त बैठका घेऊन जनजागृती करून स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले. भारतीय स्वातंत्र्याच्या पे्ररणेने झपाटलेले युवक, वृद्ध व महिलांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारला. १६ आॅगस्ट १९४२ रोजी सर्कल इन्स्पेक्टर जरासंध, पोलीस कांताप्रसाद, नायब तहसीलदार सोनवाने, एसडीओ डुंगाजी या इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या करून इंग्रजांचा युनियन जॅक उतरविला आणि तिरंगा ध्वज फडकविला. सलग तीन दिवस स्वातंत्र उपभोगले. तेव्हा १६ आॅगस्ट १९४२ ला सारा भारत देश इंग्रजांच्या गुलामीत होता. मात्र चिमूर शहर स्वतंत्र झाले होते. भारतात व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी तब्बल दीडशे वर्षांच्या कारभारात भारतीयांवर मोठा अत्याचार केला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची लाट निर्माण झाली होती. याकरिता भगतसिंग, राजगुरू यासारखे क्रांतिकारक ब्रिटिश सरकारविरूद्ध पेटून उठले.स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात चिमूरचा उठाव हे एक सोनेरी पान आहे.
१६ आॅगस्टच्या सकाळी काय घडले?
महात्मा गांधीजींच्या ‘करा अथवा मरा’ या संदेशाने चिमूर येथील क्रांतिकारक इंग्रजांविरूद्ध पेटून उठले. १६ आॅगस्ट १९४२ ला सकाळी ९ वाजता गोपाळराव कोरेकार यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व प्रभातफेरी काढण्यात आली. काँग्रेस सेवादलचे श्रीराम बिंगेवार, सखाराम माटेवार,बाबूलाल झिरे, दादाजी किरीमकर, मारोती खोबरे,गणपत खेडेकर आदी क्रांतिकारक सहभागी झाले होते. ही प्रभातफेरी जुन्या बसस्थानकाजवळून निघाली. 'व्हॉइसरॉय दिल्ली मे जुते खाये गल्ली मे' या घोषणा देत प्रभातफेरी नागमंदिराकडे निघाली. हा दिवस नागपंचमीचा होता. दुसरीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे प्रवचन सुरू होते. या प्रवचनात सुमारे पाचशे नागरिक सहभागी झाले होते. तत्कालीन ठाणेदार हरिराम शर्मा व क्रांतिकारक पांडुरंग पोतदार या दोघांनीही महाराजासमोर आपली बाजू मांडली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले, ‘तुम्ही आपल्या ठिकाणी योग्य आहात. आपले काम करा, तुमचा मार्ग तुम्हाला सापडेल’ असा सल्ला दिला. आदल्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशभक्तीच्या ज्वालाग्रही विचारांची तेजस्वी भजने सादर केली.
‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे’
‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे’ या राष्ट्रसंताच्या भजनाने क्रांतिकारकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटविली. सर्वांच्या मनात क्रांती हाच शब्द घुमत होता. भारत मातेचे स्वतंत्र्य रूप क्रांतीकारकांना दिसत होते. 'गुलामी अब नही होना, हमारे प्रिय भारत देश मे’ या भजनाने क्रांतिकारक पेटून उठले. यापैकी सेवादलाचे उद्धवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला आणि सारे कार्यकर्ते अभ्यंकर मैदावर येऊन 'भारत माता की जय' अशा घोषणा देऊ लागले. तेवढ्यात पोलीस दलाने स्वातंत्र्यवीरांच्या हातातील तिरंगा झेंडा हिसकावून १२ क्रांतीकारकांना तुरूंगात डांबले.