मृतदेह तीन तास ग्रामपंचायतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:46 PM2018-06-15T22:46:20+5:302018-06-15T22:46:36+5:30
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील ग्रा. पं.च्या रोजंदारी मजुराचा पथदिवे लावताना विद्युत शॉकने मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मृतदेह चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवला. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना शुक्रवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आक्सापूर : गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील ग्रा. पं.च्या रोजंदारी मजुराचा पथदिवे लावताना विद्युत शॉकने मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मृतदेह चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवला. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना शुक्रवारी घडली.
दीपक परशुराम गोहने (२३) रा. करंजी असे मृत मजुराचे नाव आहे. ग्रामपंचायत अंतर्गत विद्युत खांबावर पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. दीपक गोहने हा ग्रामपंचायतीमध्ये हंगामी मजूर म्हणून मागील वर्षभरापासून काम करीत होता. शुक्रवारी दीपक काही सहकाºयांसोबत खांबावर पथदिवे लावण्यासाठी गेला. मात्र विद्युत प्रवाह पूर्णपणे बंद झाला नव्हता. करंजी बसस्थानकावरील सुधाकर वाढई यांच्या घरासमोरील खांबावर दीपक चढला. विद्युत प्रवाह सुरु असल्यामुळे विद्युत शॉक लागल्याने दीपक खांबावरून खाली कोसळला. सोबतीला असलेल्या सहकाºयांनी दीपकला लगेच गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. दीपकला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची वार्ता क्षणार्धात करंजी गावात धडकली. यानंतर संपूर्ण गावकरी रुग्णालयात धडकले. सरपंच ज्योती चिचघरे यांच्यासह पदाधिकारी यावेळी रुग्णालयात हजर होते. घरातील कमावता मुलगा मृत पावल्याने कुटुंबीयांनी मदतीची मागणी रेटून धरली. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी सरपंच व पदाधिकाºयांच्या सहमतीने दहा हजार रुपये दिले.
त्यानंतर प्रेत कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी पाठविला. त्याचवेळी कुटुंबीयांनी तीन लाखांची मागणी केली. मात्र ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांत एकमत न झाल्यामुळे या मागणीवर कुणीही काही बोलू शकले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शवविच्छेदनानंतर घरी नेलेला मृतदेह पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात आणला. यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. लगेच पोलिसांना पाचारण करण्यात आला. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. सर्व पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.
तीन तासानंतर तोडगा
मृतदेह ग्रामपंचायतीत आणल्यानंतर ग्रामसेवक व पदाधिकाºयांमध्ये एकच तारांबळ उडाली. तीन तास मृतदेह तिथेच होता. पोलिसांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक यांची कार्यालयात बैठक झाली. तब्बल तीन तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर ठाणेदारांच्या मध्यस्थीने अखेर मार्ग निघाला. ग्रामपंचायतीने स्टॅम्प पेपरवर तीन लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे लिहून दिल्यानंतर गोहने कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.
ग्रा.पं.कडे निधीच नाही
ग्रामपंचायती प्रशासनाने सर्वांच्या सहमतीने मृताच्या कुटुंबीयांना तीन लाखांची मदत देण्याचे आश्वासन दिले. मात्र तुर्तास ग्रामपंचायतीकडेच निधी नसल्याने स्टँम्प पेपरवर लिहून द्यावे लागले.