नियतीने तोंडातले शब्द हिरावले; मात्र मुक्या भावनांनी त्यांना लग्नबंधनात अडकविले!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 03:12 PM2023-02-08T15:12:28+5:302023-02-08T15:15:57+5:30

मूकबधिर प्रेमीयुगुलाचा विवाह ठरला बोलका; शब्दच झाले थिटे!

deaf-mute couple ties knot in chandrapur, pledge to support each other | नियतीने तोंडातले शब्द हिरावले; मात्र मुक्या भावनांनी त्यांना लग्नबंधनात अडकविले!

नियतीने तोंडातले शब्द हिरावले; मात्र मुक्या भावनांनी त्यांना लग्नबंधनात अडकविले!

Next

राजेश माडूरवार

वढोली (चंद्रपूर) : प्रेमाला वयाचे बंधन नसते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, प्रेमासारख्या पवित्र भावनेला अभिव्यक्त होण्यासाठी शब्दाचीही गरज नसते, याची प्रचिती गोंडपिपरी येथे अनुभवायला मिळाली. प्रियकर आणि त्याची प्रेयसी दोघेही जन्मजात मूकबधिर. बोलायला शब्द नाही आणि ऐकायला नैसर्गिक ध्वनीयंत्रही नाही. मनातील भावना याच त्यांच्या आपल्या. मात्र, दोघांच्याही अंत:करणाच्या ओढीने त्यांना एकत्र आणले. दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची भावना समजली. मुक्या भावनांनीच त्यांना एकमेकांसमोर अभिव्यक्त केले आणि पोलिसांच्या सहकार्याने दोघेही विवाह बंधनात अडकले.

म्हणतात ना लग्नाच्या गाठी देवाघरीच बांधल्या जातात. त्याचाच प्रत्यय देणारा हा प्रसंग. सुनीता लिंगा मोहुर्ले (४२, रा. नागेपल्ली, पो. आलापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली) ही मूकबधिर महिला व चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील मूकबधिर रामदास प्रल्हाद धोडरे (३८) यांची मैत्री जुळली. मूकबधिर प्रल्हाद हा नेहमी मजुरीनिमित्त नागेपल्ली परिसरात जायचा. अशातच दोघांचे प्रेम शब्दाविनाच बहरत गेले. रामदाससोबत लग्न व्हावे म्हणून सुनीता घरून पळून गोंडपिपरी येथील मैत्रिणीकडे आली. सुनीताच्या घरच्यांनी शोध घेतला असता आढळून न आल्याने हरविल्याची तक्रार अहेरी पोलिसांत दाखल केली. त्यांनतर अहेरी पोलिसांना मुलगी गोंडपिपरीत मूकबधिर मुलाकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सर्व माहिती गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू यांना देण्यात आली.

राजगुरूंनी तपासाची चक्रे फिरवत शहरातील सर्व मूकबधिरांचा शोध घेत ठाण्यात बोलाविले. तपासातून मुलगी गोंडपिपरी येथील मैत्रिणीकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुलाला व मुलीला पोलिस स्टेशनला बोलावून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सुनीताने स्वगावी जाणार नसल्याची भूमिका घेतली. सामाजिक कार्यकर्ते सुरेश चरडे, कोतवाल संघटनेचे पदाधिकारी गजानन बटे, सदाशिव बोरकुटे यांनी सर्व विवाह नोंदणीची प्रक्रिया पार पाडत पोलिसांच्याच मदतीने मासूम धनवंती दर्ग्यात संस्थेतर्फे सोमवारी रीतीरिवाजाने दोघांचेही लग्न लावून देण्यात आले.

लग्नसोहळ्याला मूकबधिरांची उपस्थिती लक्षणीय

मुलाला वडील नसून आई मूकबधिर आहे. मुलीलादेखील वडील नसून आई व एक मोठा भाऊ आहे. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला परिसरातील अनेक मूकबधिरांची उपस्थिती होती. त्यांची उपस्थिती सोहळ्यात लक्षणीय ठरली. सध्या या अनोख्या विवाहाची चर्चा तालुक्यात आहे.

Web Title: deaf-mute couple ties knot in chandrapur, pledge to support each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.