मृतदेह घेऊन डीनला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:05 PM2018-10-17T22:05:56+5:302018-10-17T22:06:27+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील मथुरा रमेश जावरे या भरती रुग्ण महिलेवर योग्य उपचार न झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील मथुरा रमेश जावरे या भरती रुग्ण महिलेवर योग्य उपचार न झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करीत मृतकाच्या नातेवाईकांनी बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासमोर महिलेचा मृतदेह ठेऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला घेराव घातला. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात बराच वेळ तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे यांनी संबंधित डॉक्टरावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर एक तासाने मृतदेह उचलण्यात आला. मथुरा जावरे यांना पोटात दुखत असल्यामुळे त्या २५ सप्टेंबरला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झाल्या. ५ आॅक्टोबरला शस्त्रक्रिया करुन त्यांच्या पोटातून गोळा काढण्यात आला. मात्र त्यानंतर त्यांच्या जखमेतून सतत पाणी निघत होते. तसेच पोटात दुखतसुद्धा होते. याबाबत मथुराच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना माहिती दिली. मात्र त्यांनी कोणताहा उपचार केला नाही. दरम्यान मंगळवारी रात्री त्यांना डॉक्टरांनी रुग्णाला नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी मथुराला नागपूर येथे हलविले. मात्र तिची प्रकृती अतिशय नाजुक होती.
दरम्यान, काही वेळातच नागपूर येथे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी तसेच युवासेनेचे संदीप गिºहे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयासमोर मृतदेह आणून ठेवला. त्यानंतर अधिष्ठाता एस.एस. मोरे यांना घेराव घालून संबंधित डॉक्टरावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे रुग्णालय परिसरात बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार एस. एस. भगत यांना पाचारण करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता मोरे यांनी प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला.
डॉक्टरांनी उपचारामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी केली नाही. तरी सुद्धा रुग्णाच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचा अहवाल दोन दिवसात येणार आहे. या अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
-एस. एस. मोरे, अधिष्ठाता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर