'त्या' वाघिणीच्या मृत्यूचे रहस्य अखेर उलगडले, शेतकऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 06:00 PM2022-01-18T18:00:34+5:302022-01-18T18:12:44+5:30
वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी तुकाराम वामन मत्ते नेहमीच शेताच्या कुंपणावर ११ के.व्ही. असलेला विद्युत प्रवाह सोडत होते. दि. ३ जानेवारीला चार वर्षे वयाची पट्टेदार वाघीण या जिवंत विद्युत प्रवाहाची बळी ठरली.
भद्रावती (चंद्रपूर) : १५ दिवसांपूर्वी भद्रावती तालुक्यातील चालबर्डी (कोंढा ) शिव रस्त्यालगत वाघिणीचा मृतदेह आढळला होता. हा मृत्यू जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र आरोपी गवसत नव्हता. अखेर वनविभागाचे हात आरोपीपर्यंत पोहचलेच. याप्रकरणी कोंढा येथील शेतकरी तुकाराम वामन मत्ते (५३) याला वन विभागाने अटक केली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने घटनास्थळापासून तब्बल दीड किलोमीटर अंतरावर वाघिणीचा मृतदेह बैलबंडीने नेल्याचे तपासात पुढे आले आहे.
तुकाराम यांची कोंढा येथे स्वतःच्या मालकीची शेती आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी ते नेहमीच शेताच्या कुंपणावर ११ के.व्ही. असलेला विद्युत प्रवाह सोडत होते. दि. ३ जानेवारीला चार वर्षे वयाची पट्टेदार वाघीण या जिवंत विद्युत प्रवाहाची बळी ठरली.
ही घटना तुकाराम यांना माहिती होताच त्यांनी हे प्रकरण दडपण्यासाठी मृत वाघिणीला स्वतःच्या बैलबंडीत टाकून शेतापासून दीड किमी अंतरावरील चालबर्डी शिव रस्त्यावर आणून टाकले होते. वन विभागाच्या चौकशीनंतर आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वनकोठडी ठोठावली आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. शेंडे, क्षेत्र सहायक एन. व्ही. हनवते, वनरक्षक प्रशांत गेडाम यांनी केली.
ताडपत्रीच्या तुकड्यावरून उलगडा
मृत वाघिणीचा मृतदेह ज्या परिसरात आढळला त्या ठिकाणी वन विभागाला ताडपत्रीचा तुकडा आढळला होता. या तुकड्यावरून परिसरातील शेतात जाऊन चौकशी केली असता अशाच पद्धतीचा तुकडा तुकाराम मत्ते यांच्या शेतात सापडला. वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे यांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता सत्य बाहेर आले. या ताडपत्रीत वाघिणीचा मृतदेह गुंडाळून बैलबंडीत नेल्याची कबुली आरोपीने दिल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.