डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे महिला रुग्णाचा हकनाक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 05:00 AM2022-04-16T05:00:00+5:302022-04-16T05:00:38+5:30

तालुक्यातील पानवडाळा येथील महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने दोन किमी अंतरावर असलेल्या डोंगरगाव खडी येथील प्राथमिक आरोग्य  केंद्रामध्ये उपचारासाठी आणण्यात आले. परंतु या आरोग्य केंद्राचे प्रवेशव्दारच बंद होते व ते तारेने बांधले होते. ते काढून रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात महिलेला आणले असता, एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. तसेच डॉक्टरसुद्धा गैरहजर होते.  रुग्णाची प्रकृती आणखी बिघडल्याने तिचा तिथेच मृत्यू झाला.

Death of a female patient due to absence of doctors and staff | डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे महिला रुग्णाचा हकनाक मृत्यू

डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे महिला रुग्णाचा हकनाक मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती :  तालुक्यातील डोंगरगाव खडी येथील सार्वजनिक प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने उपचाराअभावी पानवडाळा येथील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी  घडली. डॉक्टरांसह एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.
 तालुक्यातील पानवडाळा येथील महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने दोन किमी अंतरावर असलेल्या डोंगरगाव खडी येथील प्राथमिक आरोग्य  केंद्रामध्ये उपचारासाठी आणण्यात आले. परंतु या आरोग्य केंद्राचे प्रवेशव्दारच बंद होते व ते तारेने बांधले होते. ते काढून रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात महिलेला आणले असता, एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. तसेच डॉक्टरसुद्धा गैरहजर होते.  रुग्णाची प्रकृती आणखी बिघडल्याने तिचा तिथेच मृत्यू झाला. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली. त्यानंतर या ठिकाणी भद्रावती पोलीससुद्धा दाखल झाले. घटनेची माहिती येथील डॉक्टर कातकर यांना होताच तेसुद्धा या ठिकाणी दाखल झाले. रुग्णाची तपासणी करून रुग्ण मृत  असल्याची माहिती दिली. हा सर्व प्रकार मृतकाची मुलगी कल्पना सुनील वाटेकर यांनी बघितला. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकारामुळे डोंगरगाव खडी व पानवडाळा येथील नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी करून येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत मृतदेह तिथेच ठेवला. सध्या भद्रावती पोलीस घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत. पोलिसांनी मृतकाच्या नातेवाइकांना या घटनेबाबत आपण लेखी तक्रार करावी़. त्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊ व सूचनेनुसार पुढील कारवाई करू, असे सांगितल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारासाठी नेला.

प्राथमिक उपचाराकरिता माझ्या आईला आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. उपचार मिळाल्यानंतर इतरत्र कुठेही आपण उपचारासाठी हलविले असते; मात्र येथे डॉक्टर  गैरहजर असल्याने माझ्या आईचा मृत्यू झाला.
-कल्पना सुनील वाटेकर 
(मृतकाची मुलगी)

चार महिन्यांपूर्वी प्राथमिक रुग्णालयात डॉक्टर गैरहजर असल्याची वरिष्ठांना तक्रार केली होती. या तक्रारीची दखल आजपर्यंत घेण्यात आली नसल्याने आज या महिलेचा मृत्यू झाला  आहे.
- मुकेश आस्कर, 
उपसरपंच 
डोंगरगाव खडी.

आज सुटीचा दिवस असल्याने मी उपस्थित नव्हतो. तसेच कर्मचाऱ्यांनासुद्धा सुटी होती; परंतु आरोग्य केंद्रात सिस्टर उपस्थित होत्या. प्रवेशद्वाराला आम्ही नेहमीच साखळी लावून ठेवतो. रुग्ण हा पूर्वीच मृत झालेला होता. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत.
-डॉ. सुनील कातकर, वैद्यकीय अधिकारी,  डोंगरगाव खडी.

 

Web Title: Death of a female patient due to absence of doctors and staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.