पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या वाघिणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 06:58 PM2021-06-05T18:58:51+5:302021-06-05T18:59:31+5:30
मूल तालुक्याला लागून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर आणि कोअर क्षेत्र आहे. 2 जून रोजी डोणी येथील कक्ष क्र. 327 मध्ये दोन वाघाची झुंज झाली.
मूल : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बफर क्षेत्रात मूल तालुक्यातील डोणी येथील जंगलात जखमी असलेल्या वाघिणीवर उपचार करण्यासाठी गेलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या वाघिणीचा शनिवारी मृत्यू झाला. या वाघिणीवर वनकर्मचारी पाळत ठेवून होते. दरम्यान आज सकाळी वाघिणीवर देखरेख करणारे वनकर्मचारी जंगलात गेले असता त्यांना वाघीण मृतावस्थेत आढळली.
मूल तालुक्याला लागून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर आणि कोअर क्षेत्र आहे. 2 जून रोजी डोणी येथील कक्ष क्र. 327 मध्ये दोन वाघाची झुंज झाली. यामध्ये 5 वर्ष वयाची वाघीण जखमी झाली. यामुळे ती अस्वस्थ आल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिली. तिच्यावर उपचार करण्यासाठी 3 जून रोजी पशुवेधकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे गेले होते. वाघिणीवर उपचार करण्यासाठी तिच्याकडे जात असताना वाघिणीने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान वाघिणीवर पाळत ठेवलेल्या वनकर्मचाऱ्यांनी वाघीण असलेल्या ठिकाणी जाऊन बघितले असता ती मृतावस्थेत दिसून आली. वनकर्मचाऱ्यांनी ही माहिती वनअधिकाऱ्यांना दिली. घटनास्थळावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे उपसंचालक जी. गुरुप्रसाद, बफर क्षेत्राचे सहा.वनसरक्षक जाधव, मूल बफर क्षेत्राचे वनपरीक्षेत्राधिकारी नायगमकर, जाणाळाचे क्षेत्र सहा. ए. एस. कोसरे यांनी भेट दिली. वाघिणीवर चंद्रपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले असून तिचे दहन करण्यात आले.