ट्रकच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू
By admin | Published: July 8, 2016 12:52 AM2016-07-08T00:52:54+5:302016-07-08T00:52:54+5:30
येथील बँकेतून श्रावणबाळ योजनेचे पैसे काढून घरी परत येत असताना अचानक मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एका महिलेच्या जागीच मृत्यू झाला.
मूल : येथील बँकेतून श्रावणबाळ योजनेचे पैसे काढून घरी परत येत असताना अचानक मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एका महिलेच्या जागीच मृत्यू झाला. विस्तारीबाई शंकर बोडुवार (७०) असे मृत महिलेचे नाव असून ती मूल येथील वॉर्ड क्रमांक १७ मधील रहिवासी आहे. सदर घटना आज गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला तिला मिळणाऱ्या श्रावणबाळ योजनेच्या लाभाचे पैसे बँक आॅफ इंडियाच्या येथील शाखेतून काढून घरी परत येत होती. नागपूर रोडवरील गोयल यांच्या दुकाना जवळ आली असताना या दुकानात ट्रकमधून (क्र. एमएच- ४० -७७५१) टिनाचे पत्रे उतरविल्यानंतर गांधी चौकाकडे जाण्याकरिता ट्रकचालक मधुकर सावली लांजेकर याने ट्रक सुरु केला. ट्रक सुरु करुन पुढे येत असताना विस्तारीबाईला ट्रकची धडक बसली. धडकेमुळे ती रोडवर कोसळली. सदर बाब ट्रक चालकाच्या लक्षात येण्यापूर्वी ट्रकच्या मागच्या चाकात महिलेचे दोन्ही पाय आणि कंबर आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी ट्रकचालक मधुकर सावली लांजेकर (४१) रा. चितेगाव याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याविरुद्ध कलम २७९ आणि ३०४ भारतीय दंड संहिते अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेच्या पुढील तपास पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मेघा गोखरे करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)