सिरपूरच्या तलावातील संपूर्ण माश्यांच्या मृत्यू
By admin | Published: April 6, 2015 01:00 AM2015-04-06T01:00:19+5:302015-04-06T01:00:19+5:30
चिमूर तालुक्यातील सिरपूर येथील जनसेवा मच्छिमार सहकारी संस्थाचे अधिकार क्षेत्रात गावबोडी तलाव आहे. या
चिमूर पोलिसात तक्रार : समाजकंटकांनी विष टाकल्याचा संस्थेचा आरोप
चिमूर: चिमूर तालुक्यातील सिरपूर येथील जनसेवा मच्छिमार सहकारी संस्थाचे अधिकार क्षेत्रात गावबोडी तलाव आहे. या तलावातून मच्छिमार व्यवसाय करण्यात येत आहे. शनिवारी अचानकपणे तलावातील संपूर्ण मासे मृत्यू पावल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस स्टेशन चिमूरला दिलेल्या तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, काही समाजकंटकांनी तलावात विष टाकल्याने माश्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप संस्थेने केला असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
सिरपूर तलाव हा जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून पंचायत समितीमार्फत जनसेवा मच्छिमार सहकारी संस्थेला पाच वर्षाच्या लिजवर देण्यात आला आहे. या तलावातून मच्छिमार व्यवसाय केला जातो व संस्थेच्या सभासदांची उपजीविका करुन उदरनिर्वाह चालत आहे. दररोज संस्थेचे सभासद तलावाची पाहणी करतात. परंतु ३ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान मनोहर भानारकर, सुभाष मोहिनकर व दिवाकर डहारे यांनी पाहणी केली. त्यावेळी सर्व व्यवस्थित होते. ४ एप्रिलला गावातील नागरिक शौचालयासाठी सकाळी तलावाकडे गेले असता तलावातील संपूर्ण मासे मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांनी तलावाकडे जाऊन पाहणी केली तलावातील लहान मोठे मासे मृत्यू पावल्याचे दिसले. या माश्यांचा मृत्यू कोणत्याही प्रकारच्या रोगाने झाला नसून कटकारस्थान रचून तलावात विष टाकून मारल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष मनोहर भानारकर व सचिव दिवाकर डहारे यांनी केला. पूर्व विदर्भात तलावांची संख्या जास्त असून तलावातील मासे पकडून ढिवर समाज मोठ्या प्रमाणात आपली उपजीविका करीत आहेत. मत्स्य व्यवसायात अशा प्रकारची घटना घडल्यास त्यावर शासनाकडे कोणत्याही उपाययोजना नाही, याची खंत भाजपा मच्छिमार सेल पूर्व विदर्भ संयोजक डॉ. दिलीप शिवरकर यांनी व्यक्त केली आहे. तलावातील पाण्याची तपासणी करावी व संस्थांना मदत करावी, अशी मागणीही डॉ. शिवरकर यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
पोलिसांनी केली पाहणी
याबाबत चिमूर पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचून तपास करीत आहे. तलाठी निखाडे यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. या घटनेत दोन लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. यामुळे संस्थेच्या सभासदांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. प्रभारी तहसीलदार तनगुलवार यांना संस्थेच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्याच्या नेतृत्वात शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.