नियमाला डावलून मातीचे ढिगारे
By admin | Published: June 4, 2014 11:38 PM2014-06-04T23:38:49+5:302014-06-04T23:38:49+5:30
कोळशाच्या उत्खनानंतर निघणार्या मातीचे ढिगारे ही चंद्रपूर जिल्ह्यातील खाणप्रवण क्षेत्रातील मोठी समस्या आहे. नियमांची पायमल्ली करत वेकोलिने मिळेल त्या जागेवर हे डोंगराएवढे मातीचे ढिगारे उभे
चंद्रपूर : कोळशाच्या उत्खनानंतर निघणार्या मातीचे ढिगारे ही चंद्रपूर जिल्ह्यातील खाणप्रवण क्षेत्रातील मोठी समस्या आहे. नियमांची पायमल्ली करत वेकोलिने मिळेल त्या जागेवर हे डोंगराएवढे मातीचे ढिगारे उभे केले आहेत.
कोळसा उत्खननानंतर निघणारी माती कुठे व कशी टाकावी, याचे काही आदर्श नियम आहेत. नैसर्गिक जलस्त्रोतापासून एक किलोमिटर अंतरावर असे ढिगारे उभे करावे, असे संकेत आहेत. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी अगदी नदीच्या काठावरच हे ढिगारे उभे करण्यात आले आहे. यामुळे नदीचे पात्र अरुंद होतच आहे, सोबतच नदीच्या पात्रात माती साठली जाऊन नदीचे पात्र अनेक ठिकाणी उथळ झाले आहे. या ओव्हरबर्डनमुळे पुराचाही धोका वाढला आहे.
मातीचा ढिगारा उभा करताना तो खचू नये, यासाठी बेंचेस तयार करावे लागतात. मात्र वेकोलिकडून अनेक ठिकाणी हा नियमच पाळण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकदा ढिगारे खचण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
कोळशाचे उत्खनन करताना जमिनीतील पाणी मोठय़ा प्रमाणावर बाहेर येते. वेकोलिकडून त्याचा साठाही केला जातो. त्यावर प्रक्रीया केल्यानंतरच तो नदीच्या प्रवाहात सोडला जावा, असे संकेत आहेत. मात्र या संकेताना वेकोलिकडून कायम मुठमाती दिली जात आहे. प्रक्रीया न करताच ते दूषित पाणी नदीत सोडले जात असल्याने नदीचा नैसर्गिक प्रवाह प्रदूषित होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलि आणि खासगी अनेक कोळसा खाणी आहेत. या खाणींमधून धुळीचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होत आहे. असे असताना त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजना अतिशय तोकड्या आहेत. पर्यावरण कायद्यानुसार अनेक नियम व अटी या कोळसा खाणींना घालून देण्यात आल्या आहेत. मात्र त्याचे पालनच होताना दिसून येत नाही. कोळशाच्या धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोळशावर आधारिक उद्योग वा खाण परिसरातील रस्त्यांवर पाण्याचे नियमित सिंचन केले जावे, असा एक नियम आहे. परंतु अनेक उद्योग व वेकोलिच्या कोळसा खाण प्रशासनाकडून या नियमाचे पालनच केले जात नाही.