कर्ज वाटपात हयगय चालणार नाही!
By admin | Published: March 10, 2017 01:54 AM2017-03-10T01:54:23+5:302017-03-10T01:54:23+5:30
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेमध्ये गरज नसताना अर्जदार युवकांना तारणाची मागणी करीत येत आहे.
हंसराज अहीर : मुद्रा योजनेची कर्ज प्रकरणे तातडीने निकाला काढा!
चंद्रपूर : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेमध्ये गरज नसताना अर्जदार युवकांना तारणाची मागणी करीत येत आहे. ही बाब केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेचा आढावा घेताना कर्ज प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देऊन यामध्ये तारण मागण्याचे प्रकार आढळून आल्यास आणि कर्ज वाटपात कामचुकापणा केल्यास सहन केले जाणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली.
मुद्रा बँक योजना विनातारण असून बँकांना योजनेंतर्गत तारण मागण्याची आवश्यकता नाही. असे असताना अनेक ठिकाणी तारण मागितले जात असल्याच्या घटना दिसून येत आहे. असे झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. बँकांनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उदार दृष्टिकोन समोर ठेऊन कर्ज वाटप करावे, असे ते म्हणाले. यावर्षी या योजनेतून देशात २ हजार ४४ कोटी रूपयांचे कर्ज वाटप झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी बँकांनी कर्ज प्रकरणाची माहिती तातडीने प्रशासनास उपलब्ध करावी. ग्रामीण भागातील बँकांच्या शाखांनी अधिक कर्ज वाटप करावे, महिला सक्षमीकरणासाठी महिला बचतगटांना मोठ्या प्रमाणात कर्ज वितरित करावे, असे जिल्हाधिकारी यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, अग्रणी बँक प्रबंधक ईश्वर गिरडकर यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कृषीपुरक उद्योगांना चालना द्या!
ना. अहीर यांनी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, कॅशलेस व्यवहार व जिल्ह्यात विविध बँकांमध्ये असलेल्या रोख रकमेच्या उपलब्धतेचाही आढावा घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्माण करण्यासोबतच स्वयंरोजगारासाठी आर्थिक पाठबळ देण्यासाठी मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातही या योजनेची चांगली अंमलबजावणी होण्यासाठी बँकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी कर्ज देण्यासोबतच ग्रामीण भागात कृषी पुरक उद्योगाला चालना देण्यासाठी बँकांनी हातभार लावणे आवश्यक आहे, असेही निर्देश त्यांनी दिले.