ग्रामपंचायतींना उत्पन्न वाढीसाठी साडेबारा कोटींचे कर्ज
By admin | Published: April 28, 2016 12:44 AM2016-04-28T00:44:36+5:302016-04-28T00:44:36+5:30
गेल्या अनेक वषार्पासून प्रलंबित असलेल्या जिल्हा ग्राम विकास निधीचे ग्रामपंचायतींना कर्ज स्वरुपात वितरण करण्याचा...
ग्रामपंचायतींना मिळाले उत्पन्नाचे स्त्रोत : १५ वर्षांत प्रथमच मोठ्या निधीचे वितरण
चंद्रपूर : गेल्या अनेक वषार्पासून प्रलंबित असलेल्या जिल्हा ग्राम विकास निधीचे ग्रामपंचायतींना कर्ज स्वरुपात वितरण करण्याचा लोकाभिमुख निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आहे. यातून ग्रामपंचायतींना उत्पन्न वाढीची संधी निर्माण करुन दिली आहे. १५ वर्षात प्रथमच १२ कोटी ४३ लाख १२ हजार ८७१ रुपयांचा जिल्हा ग्राम विकास निधी कर्ज स्वरुपात वाटप केल्याने ग्राम पंचायतीला स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करता येऊन ग्रामपंचायत आर्थिकदृष्टया सक्षम होतील, असे दिसून येत आहे.
ग्रामपंचायतीच्या स्वत:च्या उत्पन्नावर ०.२५ टक्के अंशदान जिल्हा ग्राम विकास निधीच्या जिल्हा स्तरावरील खात्यात ग्रामपंचायतमार्फत जमा केल्या जाते. त्या खात्यावर उपलब्ध असलेल्या निधीतून ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार कर्ज उपलब्ध करुन दिल्या जाते. परंतु ग्रामपंचायती कर्ज घेण्यास इच्छुक नसल्यामुळे १९८५ ते २०१३-१४ पर्यंत केवळ एक कोटी ८० लाख ३० हजार एवढाच निधी कर्ज स्वरुपात वितरीत करण्यात आला होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा ग्राम विकास निधी वितरणाचा २० ते २२ वषार्पासूनचा आढावा घेतला. सदर योजनेचा निधी जिल्हयातील ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांच्या लक्षात येताच जिल्हा परिषदेकडे १५ वषार्पासून प्रलंबित असलेल्या १५ कोटी ४५ लाख ८० हजार निधीचे नियोजन करुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हयातील १२ पंचायत समित्यांना १२ कोटी ४३ लाख १२ हजारांचा निधी तात्काळ वितरित केला. या निधीमधून ग्रामपंचायतीला आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यास पाठबळ मिळणार आहे. जिल्हा ग्राम विकास निधी अंतर्गत कर्ज मागणीचे ८६ प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. त्यापैकी 70 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यात ट्रॅक्टर खरेदी, दुकान गाडे बांधकाम, बँक इमारत, मंगल कार्यालय व सांस्कृतिक भवन, सिमेंट क्राँकेट रोड, बाजार ओटे, स्मशानभूमिचे वॉल कंपाऊंड, सार्वजनिक वाचनालय, कोंडवाना बांधकाम व विश्रामगृह बांधकाम इत्यादीचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर ग्रामपंचायतींना मोठया प्रमाणात कर्ज स्वरुपात निधी वितरित करण्यात आल्याने ग्रामपंचायतींना आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. (शहर प्रतिनिधी)