८३५ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:26 AM2021-05-17T04:26:48+5:302021-05-17T04:26:48+5:30
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीद्वारे संवाद साधला. राज्यातील ८३५ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय ...
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीद्वारे संवाद साधला. राज्यातील ८३५ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आ. मुनगंटीवार यांनी ५ मे रोजी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सदर निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. मंत्री राजेश टोपे यांनी त्वरित हा निर्णय मागे घेत बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र १० दिवसांचा कालावधी लोटूनही अद्याप हा निर्णय मागे घेण्यात आलेला नाही व सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही, असे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
आज कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्यांना नियुक्त्या मिळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्यांना सध्या देण्यात येणा-या वेतनात वाढ करण्याची सुध्दा आवश्यकता असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ना. राजेश टोपे यांनी आश्वासन दिल्यानंतर आपण त्यांना रोज स्मरणपत्रे पाठवून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने बघण्याची आवश्यकता असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले. बैठकीला डॉ. अक्षय जव्हेरी, डॉ. निशिगंधा, डॉ. अश्विनी भोयर, डॉ. सचिन पांडव, क्षितीज झाडे, डॉ. सूरज पवार, डॉ. योगेश देवतळे, डॉ. खुशबू जोशी, डॉ. स्वप्निल हिवराळे, डॉ. विष्णू बावणे, डॉ. करिश्मा येडे, डॉ. स्वप्निल मून, डॉ. मोरे, डॉ. दीपक ढोके, डॉ. अनामिका चंद्रगिरीवार, डॉ. नितीन मॅकलवार, डॉ. पायल वरभे, डॉ. संतोष गोफणे, आदींची उपस्थिती होती.