दारूबंदीचा निर्णय हा राजकीय सौदा
By admin | Published: January 23, 2015 12:33 AM2015-01-23T00:33:16+5:302015-01-23T00:33:16+5:30
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला दारूबंदीचा निर्णय म्हणजे चंद्रपूर जिह्यापुरती राजकीय खेळी असून विधानसभेच्या निवडणुकीतील राजकीय सौदा आहे, ...
चंद्रपूर: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला दारूबंदीचा निर्णय म्हणजे चंद्रपूर जिह्यापुरती राजकीय खेळी असून विधानसभेच्या निवडणुकीतील राजकीय सौदा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नोंदविली आहे. सोबतच, केवळ जिल्ह्यातच दारूबंदीचा निर्णय न राबविता राज्यातही दारूबंदी करण्याची मागणी केलीआहे.
विधानसभेच्या निवडणुकीत श्रमिक एल्गारच्या नेत्या पारोमिता गोस्वामी यांनी दुर्गादेवी होऊन भाजपा नेत्यांशी विधानसभा निवडणुकीपुरता सौदा केला. या सौद्यात गठ्ठा मतांच्या बदल्यात दारुबंदीचा शब्द त्यांनी घेतला. निवडणुकीनंतर ना. मुनगंटीवार यांच्याकडून हा शब्द पूर्ण करून घेतला. यामुळे पारोमिता गोस्वामी खऱ्या हीरो ठरल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
ना. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. ते संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री असल्याने व्यापक दृष्टीकोन ठेवून त्यांनी राज्यातच दारूबंदी लागू करायला हवी होती. लगतच्या वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असूनही परिणाम काय ते दिसत आहेतच. सिमेवरील जिल्ह्यात दारूची दुकाने थाटून मद्याचा बाजार सुरु आहे. हेच चित्र उद्या चंद्रपूरच्या बाबतीत पहावयास मिळेल, अशी शंकाही त्यांनी वर्तविली. (जिल्हा प्रतिनिधी)