महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा
By Admin | Published: October 9, 2016 01:30 AM2016-10-09T01:30:54+5:302016-10-09T01:30:54+5:30
राज्यभर मोठ्या प्रमाणात पाऊस असून विदर्भ, मराठवाड्यात अति पावसामुळे ओला दुष्काळ पडला आहे.
अशोक चव्हाण : महाराष्ट्र सरकार संवेदनाहीन
राजुरा : राज्यभर मोठ्या प्रमाणात पाऊस असून विदर्भ, मराठवाड्यात अति पावसामुळे ओला दुष्काळ पडला आहे. ओला दुष्काळ जाहीर करून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केली. खा.
चव्हाण राजुरा तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या संवेदना नष्ट झाल्या आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या ३ हजार ५०० आत्महत्या झाल्या आहे. आत्महत्या झाल्यानंतर मदत करण्यापेक्षा जीवंतपणी कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. विदर्भ, मराठवाड्याचा अनुशेष पूर्ण झाला पाहिेजे. सोयाबीन, कापूस, मूग, तूर आदी सर्व पीके नष्ट झाली आहेत. राज्य शासनाने पोकळ घोषणा देण्यापेक्षा मदत जाहीर करावी. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करा, अशीही मागणी खा. चव्हाण यांनी केली.
याप्रसंगी मेळाव्याचे उद्घाटन माजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, जेष्ठ नेते अनंतराव घारड, राजुरा विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक बाबुराव तिडके, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी आमदार आनंदराव गेडाम, नामदेवराव उसेंडी, प्रकाश मारकवार, प्रमोद तितरमारे, चंद्रपूर महिला काँग्रेस अध्यक्ष अश्विनी खोेब्रागडे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवाराव पोलगेट्टी, माजी आमदार सुभाष धोटे, राजुरा अध्यक्ष दादा लांडे, कोरपना विठ्ठल थिपे, जिवती, गोदरू जुमनाके, गोंडपिपरी, रा. चंदेल, युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष देरकर, नगराध्यक्ष मंगला आत्राम, उपाध्यक्ष अरुण धोटे, राजुरा शहर अध्यक्ष सुनील देशपांडे, गटनेते स्वामी येरोलवार, बँकेचे माजी अध्यक्ष शेखर धोटे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गोलू ठाकरे, एजाज अहमद आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक मेळाव्याचे आयोजक व माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकामधून राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक विकासाची कामे केल्याचे सांगितले. या विकासाला खिळ बसत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी शेतकरी संघटना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.संचालन सचिन फुलझेले यांनी केले. आभार राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)