पत्रकारांना फ्रंटलाईन कोरोना वॉरिअर घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:34+5:302021-05-03T04:22:34+5:30
वृत्तपत्र व टीव्ही पत्रकारांना फ्रंटलाईन कोरोना वॉरिअर घोषित करून त्यांना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना १५ लाखांची मदत देण्यात ...
वृत्तपत्र व टीव्ही पत्रकारांना फ्रंटलाईन कोरोना वॉरिअर घोषित करून त्यांना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना १५ लाखांची मदत देण्यात येत आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातसुद्धा पत्रकारांना फ्रंटलाईन वॉरिअर घोषित करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
देशात, राज्यात तसेच जिल्ह्यातदेखील पत्रकार २४ तास आपली सेवा बजावत आहेत. त्यामध्ये आतापर्यंत देशात जवळपास १६५ पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातदेखील काम करणाऱ्या पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पत्रकारांच्या मृत्यूने समाजाचीच नाही तर त्यांच्या कुटुंबाचीदेखील भरून न निघणारी हानी झाली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजन व धोरणामुळे महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीचा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी थांबला. कोरोना बाधितांची संख्या व बाधित मृत्यूंची संख्या दिवसागणिक वाढत असताना पत्रकार जीवाची बाजी लावून वृत्त संकलन करीत आहेत. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी राज्य सरकारने घेऊन त्यांना फ्रंटलाईन कोरोना वॉरिअर म्हणून घोषित करून लसीकरण करावे, असे आदेश प्रशासनाला देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.