चंदनखेड्यातील नेहरू विद्यालयाला उतरती कळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:30 AM2017-12-22T00:30:10+5:302017-12-22T00:30:33+5:30
सन १६७० ला चंदनखेडा येथे स्थापन करण्यात आलेल्या नेहरु विद्यालयाला सद्य:स्थितीत उतरती कळा लागली आहे. या शाळेने पंचक्रोशित नाव कमाविले असले तरी संस्था संचालक व मंडळात नेहमीच अंतर्गत वाद उद्भवत असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनखेडा : सन १६७० ला चंदनखेडा येथे स्थापन करण्यात आलेल्या नेहरु विद्यालयाला सद्य:स्थितीत उतरती कळा लागली आहे. या शाळेने पंचक्रोशित नाव कमाविले असले तरी संस्था संचालक व मंडळात नेहमीच अंतर्गत वाद उद्भवत असते. तसेच कार्यरत मुख्याध्यापकाच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे या शाळेत अनेक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या नावलौकीक शाळेला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे.
चिमूर एज्युकेशन सोसायटी, चिमूर अंंतर्गत ही शाळा चालविली जाते. या संस्थेच्या चंदनखेडा सोबतच चिमूर, शंकरपूर, चारगाव, शेगाव बुज. येथेही शाळा आहेत. सुरुवातीचा काही वर्षांचा कालावधी सोडला तर संचालक मंडळात नेहमीच वाद झाला आहे. त्याचे पर्यवसान शाळेकडे संस्थेचे दुर्लक्ष होत गेले व दिवसेंदिवस समस्या वाढत गेल्या. परंतु, येथील समस्यांबाबत संचालक मंडळाला एकदाही लेखी पत्राद्वारे शाळेच्या समस्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न कार्यरत मुख्याध्यापकाने केला नाही. आजघडीला या शाळेची इमारत मोडकळीस व धोकादायक स्थितीत असतानाही तेथे वर्ग भरविण्यात येत आहे.
छताचे कवेलू फूटल्याने पावसात छत गळत असते. खोलीत पंखे नाही, भिंतींना रंगरंगोटी नाही, मुलांकरिता संगणक संच नाही. तसेच मुला-मुलींकरिता स्वतंत्र शौचालय, मुत्रीघर नाही. खिडक्यांना तावदान नाही. चतुर्थ श्रेणी कर्मचारी एकच असल्याने मुलांनाच शाळेची खोली व परिसर स्वच्छता करावी लागत आहे. काही वर्षांपूर्वी इमारतीची निकड लक्षात घेवून काही उत्साही शिक्षकानी पुढाकार घेतला. गावकरी व संस्थेच्या मदतीतून व्यवसायिक नाटकाचे आयोजन करुन त्यातून मिळालेल्या रक्कमेतून तथा इतर रक्मकेची जुळवाजुळव करुन एक मजली इमारत बांधण्यात आली होती. मात्र आता अनेक वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे.
सुरुवातीच्या काळात शाळेतील शिक्षणाचा दर्जा होता. परंतु आजघडीला शाळेला कोणी वाली नसल्याने शाळेचा शैक्षणिक दर्जा खूप घसरला आहे. शंभर टक्के अनुदान मिळाणाऱ्या या शाळेत एकेकाळी विद्यार्थ्यांची दाटी होत होती. मात्र आता या शाळेत विद्यार्थी, पटसंख्या टिकवून ठेवण्याकरिता गावोगावी भटकंती करून तथा मुलांना खाजगी वाहन किरायाने करुन नेण्याची व्यवस्था स्वत: शिक्षकांना करावी लागत आहे.
शाळेच्या हितासाठी जेवढे प्रयत्न करता आले तेवढे केले. मात्र संस्थेच्या वादात शाळेचा विकास झाला नाही. उलट मला निवृत्तीची केस सादर करावी लागली.
- नंदा सोनकुसरे,
मुख्याध्यापिका, चंदनखेडा.