चपराळा वनक्षेत्रात वाघिणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 10:49 AM2023-10-03T10:49:28+5:302023-10-03T10:50:29+5:30
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
भद्रावती (चंद्रपूर) : भद्रावती वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्र चपराळा येथे सोमवारी दुपारी वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृत वाघीण सात वर्षांची आहे. वाघिणीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
भद्रावती वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्र चपराळा येथील कक्ष क्रमांक २११ मध्ये वन कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. शेंडे यांना देण्यात आली. ते सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, वनरक्षक जे. ई. देवगडे, रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कोडचलवार, वन्यप्रेमी बंडू धोत्रे आदी उपस्थित होते. ट्रांझी ट्रीटमेंट सेंटर चंद्रपूर येथे वाघिणीचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. शेंडे यांनी सांगितले.