सिंदेवाही तालुक्यात धानाच्या सरासरी उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 09:51 PM2018-01-08T21:51:37+5:302018-01-08T21:52:28+5:30
आॅनलाईन लोकमत
सिंदेवाही : सिंदेवाही उद्योग विरहीत तालुका असून या तालुक्यात धानाचे मुख्य पीक घेतले जाते. मात्र सिंचनाचे साधन नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असते. यावर्षी अत्यल्प पावसामुळे धान पिकाला प्रचंड फटका बसला. त्यातच धान पिकावर विविध रोगाने आक्रमण केल्याने उतारीत सरासरी कमालीची घट आली आहे. त्यामुळे शासनाने प्रती क्विंटल ३ हजार रुपये भाव द्यावे, अशी मागणी सिंदेवाही तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांनी केली आहे.
सततच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच शेती व्यवसायासाठी आवश्यक असलेले रासायनिक खत, कीटकनाशक औषधी, बीज आदीचे भाव महागले आहेत. मात्र त्या मानाने उत्पादन खर्चाचा विचार केल्यास शेतकºयांना खर्चानुसार त्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. खते, कीटकनाशक यांचे दर लक्षात घेतले तर मजुरीसुद्धा परवडत नाही. अशा परिस्थितीत शेतकºयांनी जगावे की मरावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दैनावस्था झाली असून शासनाने आधारभूत किंमत ठरवून शेतकºयांना प्रती क्विंटल तीन हजार रुपये भाव द्यावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.
कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, पण शेतकºयांना काय ?
शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनामध्ये पुन्हा वाढ होईल. परंतु भुमीपुत्राच्या शेतीचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जबाजारी होवून डबघाईस आलेल्या शेतकºयांसाठी शासन कोणता आयोग राबविणार, असे शेतकरी बोलत आहेत. निसर्गाचा कोप आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे शेतकºयांचे कर्जाचे डोंगर वाढतच आहे. त्यातच उत्पादीत मालाला अल्प दर मिळत असल्याने शासनाकडून शेतकºयांची बोळवण केली जात आहे. उत्पादनापेक्षा खर्च अधिक अशी स्थिती शेतकºयांची आहे. अनेकांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने शेतकºयांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.