नारंड्यात शिष्टाचाराचा नियमभंग करून ग्रामपंचायतीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:31 AM2021-08-13T04:31:46+5:302021-08-13T04:31:46+5:30
कोरपना : तालुक्यातील नारंडा येथील नवीन ग्रामपंचायतीचा लोकार्पण सोहळा सरपंचांनी शिष्टाचाराचा नियमभंग करून केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य वीणा ...
कोरपना : तालुक्यातील नारंडा येथील नवीन ग्रामपंचायतीचा लोकार्पण सोहळा सरपंचांनी शिष्टाचाराचा नियमभंग करून केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य वीणा सुरेश मालेकर व पंचायत समिती सदस्य श्याम रणदिवे यांनी कोरपना येथे आयोजित पत्रपरिषदेत केला.
५ ऑगस्ट रोजी नारंडा येथे सरपंच सुपुत्राच्या वाढदिवशी नवीन ग्रामपंचायत इमारतीचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सरपंच, ग्रामपंचायत नारंडा यांनी केले होते. मात्र, या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक विरोधी ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना हेतुपुरस्सर निमंत्रित करण्यात आले नाही. हा प्रकार नियमानुसार शिष्टाचाराचे पालन न करता हुकूमशाही प्रणालीला वाव देणारा आहे. हा कार्यक्रम केवळ सत्ताधारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा होता काय, असा सवाल उपस्थित करत या प्रकाराचा निषेध करून सरपंचावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.
कोट
सरपंचाच्या विशेषाधिकारातून ग्रामपंचायतीचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य यांच्याकडूनसुद्धा अनेक कार्यक्रमांत नियमानुसार आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती व आम्हाला निमंत्रित करून पाचारण केले जात नाही. त्यामुळे आम्ही त्यांना निमंत्रित केले नाही. त्यांच्याकडूनही या बाबीचे पालन झाल्यास आम्ही त्यांना निमंत्रित करू
- अनुताई ताजणे,
सरपंच ग्रामपंचायत, नारंडा