चंद्रपूर जिल्ह्यात ८२४ ग्रामपंचायतींमध्ये डीप क्लिनिंग मोहीम
By साईनाथ कुचनकार | Published: January 17, 2024 04:40 PM2024-01-17T16:40:52+5:302024-01-17T16:41:34+5:30
मंदिर महास्वच्छता अभियानाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गावातील मंदिरे, धार्मिक स्थळे व परिसर पूर्णतः स्वच्छ करण्यात येणार आहे.
चंद्रपूर : जिल्ह्यातील ८२४ ग्रामपंचायतींत संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात महास्वच्छता अभियानाने झाली. संपूर्ण स्वच्छता मोहिमेमध्ये स्वच्छतेची व्यापक कामे करण्यात येणार आहेत.
मंदिर महास्वच्छता अभियानाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गावातील मंदिरे, धार्मिक स्थळे व परिसर पूर्णतः स्वच्छ करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने एक पत्र काढले असून, सर्व गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेने निर्देशही दिले आहेत. विशेष म्हणजे. २० जानेवारीला एकाच दिवशी जिल्ह्यातील सर्व गावांतील मंदिरांचीही स्वच्छता केली जाणार आहे.
मंदिर महास्वच्छता अभियान प्रत्येक गावात यशस्वी करण्यासाठी तालुका स्तरावरून नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. अभियान कालावधीत सर्व गावातील मंदिरे, धार्मिक स्थळे व परिसर स्वच्छ करण्यासाठी सर्व गावांत मंदिर महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी जनजागृती करून, गावातील बचत गट, ग्रामपंचायत सदस्य, भजनी मंडळ, युवक मंडळ, तसेच गावातील कर्मचाऱ्यांनाही या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा लागणार आहे. गावपातळीवरील व्हॉटस्ॲप दवंडी व नोटीस देऊन व गावामध्ये सर्व दर्शनी भागात फ्लेक्स लावून प्रसिद्धी व जनजागृती करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
एक दिवस मंदिर स्वच्छतेसाठी
जिल्ह्यातील सर्व मंदिर व धार्मिक स्थळे व त्यांचा परिसर स्वच्छता करून, मंदिरावर रोशनाई करण्यात येणार आहे. सर्व मंदिरे व आसपासच्या परिसरातील स्वच्छता मोहीम स्वरूपात करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतनिहाय स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय मंदिर महास्वच्छता अभियान चंद्रपूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र वढा येथून करण्यात येणार आहे. २० जानेवारी रोजी एक दिवस मंदिर स्वच्छतेसाठी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व गावांत यादिवशी मंदिर महास्वच्छता अभियान राबवून जिल्ह्यातील सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे पूर्णतः स्वच्छ करावी. जिल्ह्यात मंदिर महास्वच्छता अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये संपूर्ण स्वच्छता सप्ताह १४ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत मंदिर व धार्मिक स्थळे स्वच्छ करायची आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात मंदिर महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानामध्ये सहभाग घेऊन मोहीम यशस्वी करा. -विवेक जॉनसन मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर.