अटकेच्या भीतीने कचऱ्यात फेकली हरणाची कातडी, चंद्रपुरात खळबळ
By राजेश मडावी | Published: September 5, 2023 04:24 PM2023-09-05T16:24:11+5:302023-09-05T16:25:11+5:30
हरणाची शिकार झाल्याचा संशय
चंद्रपूर : शहरातील तुकूम आदर्श चौक परिसरातील कचऱ्यात मंगळवारी (दि. ५ ) हरणाची कातडी आढळल्याने खळबळ उडाली. हॅबीटॅट कंझर्वेक्षण सोसायटीच्या सदस्यांनी वन विभागाला माहिती दिल्यानंतर पाहणी केली असता ही कातडी हरणाचीच असल्याचे स्पष्ट झाले. शिकार केल्यानंतर अटकेच्या भितीने कातडी घरी न ठेवता फेकून दिल्याची शक्यता वन विभागाच्या पथकाने वर्तविली आहे.
चंद्रपूरातील तुकूम परिसरातील आदर्श चौक परिसरात डॉ. कुलकर्णी यांचे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल समोरच पोलिस वसाहतीची भिंत लागून असून दिवसभर व रात्री ११ वाजेपर्यंत नागरिकांची मोठी वर्दळ असते. या भिंतीला लागूच कचरा टाकला जातो. मंगळवारी सकाळी फिरायला गेले असता हॅबीटॅट कंझर्वेक्षण सोसायटीचे साईनाथ चौधरी व शुभम जगताप यांना कचऱ्यात ही कातडी दिसली. त्यांनी लगेच वनविभागाला माहिती दिली. चंद्रपूर वनविभागाचे बिट गार्ड प्रदीप कोडापे व हॅबीटॅट कंझर्वेक्षण सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे घटनास्थळी पोहोचले. कातडीच पाहणी केली असता हरिणाचीच असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, चंद्रपूर शहराच्या मध्यभागी ही कातडी कुणी आणून टाकली, हा प्रश्न वनविभागासमोर उपस्थित झाला आहे.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी
वर्दळीच्या ठिकाणी कचऱ्यात हरणाची कातडी फेकल्याने आश्चर्य सगळे व्यक्त होत आहे. चितळाची शिकार करून ती चंद्रपुरात आणण्यात आली. हरणाची कातडी घरी आढळल्यास अटक होईल, या भीतीने कचऱ्यात फेकली असावी.चंद्रपुरात अशी घटना पहिल्यांदाच घडली. वनविभागाने पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दखल केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी चंद्रपूर वन विभागाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचा निर्मय घेतला आहे.