सेवानिवृत्तांना मिळणार रखडलेली गट विम्याची रक्कम; ५ वर्षांपासून होते वंचित
By साईनाथ कुचनकार | Published: December 8, 2023 02:39 PM2023-12-08T14:39:03+5:302023-12-08T14:39:46+5:30
पाच वर्षांपासून होते वंचित : ४७४ यापैकी शिक्षण विभागाचे २६५ प्रकरणे
चंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षकांचे मागील पाच वर्षांपासून गट विम्याची रक्कम प्रलंबित आहे. ही रक्कम मिळावी यासाठी सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेमार्फत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्यात आला. दरम्यान, चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी गायकवाड यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन प्रलंबित असलेल्या गट विम्याची प्रकरणे निकाली काढण्याची विनंती केली. यानंतर ३१ डिसेंबरपूर्वी प्रकरण निकाली काढण्याचे आश्वासन मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी गायकवाड यांनी दिले आहे. यामुळे मागील पाच वर्षांपासून प्रलंबित प्रकरण निकाली निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मागील पाच वर्षापासून गट विम्याची रक्कम प्रलंबित आहे. यामध्ये शिक्षण विभागात २६५ प्रकरणे, सामान्य प्रशासन विभागामध्ये ११०, आरोग्य विभागामध्ये ३५ तसेच इतर विभागामध्ये ६४ प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण त्वरित निकाली काढण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. विशेष म्हणजे, ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पूर्ण कागदपत्रांचा प्रस्ताव दिला नसेल त्यांनी त्वरित जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव आणून देण्याची विनंतीही करण्यात आली आहे. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटन सल्लागार विजय भोगेकर, अध्यक्ष गणपत विधाते, सरचिटणीस सुरेश बोंडे, सुरेश गिलोरकर, तुकाराम कुचनकार,ओमदास तुरानकर यांच्यासह अन्य सदस्यांची उपस्थिती होती.