चारा, पाण्याअभावी दूध उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:35 PM2019-04-15T22:35:50+5:302019-04-15T22:36:27+5:30
समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली. परिणामी, दुधाचे उत्पादन घटले असून शासकीय दुग्ध शाळेत केवळ पाच हजार लिटर दुधाचे संकलन करून तेवढेच वितरण करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांकडून मागणी असूनही पुरेसे दूध मिळत नसल्याने आधीच हतबल झालेल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली. परिणामी, दुधाचे उत्पादन घटले असून शासकीय दुग्ध शाळेत केवळ पाच हजार लिटर दुधाचे संकलन करून तेवढेच वितरण करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांकडून मागणी असूनही पुरेसे दूध मिळत नसल्याने आधीच हतबल झालेल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
विदर्भातून सर्वाधिक कमी दुध उत्पादन करणारा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. सिंचनाचे क्षेत्र समाधानकारक नसल्याने हजारो शेतकरी केवळ भातशेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पारंपरिक भातशेतीमधून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. पण, नाईलाजास्तव शेतकºयांना दिवस ढकलण्याशिवाय दूसरा पर्यायच नाही. शेतीला पूरक व्यवसाय करण्याच्या केवळ घोषणा झाल्या. मात्र, लोकप्रतिनिधींनी यादृष्टीने परिणामकारक प्रयत्न केले नाही. त्यामुळे हजारो शेतकरी पारंपरिक शेतीच्या दुष्टचक्रात अडकले आहेत. लागवडीचा खर्चही मिळत नाही. सिंचनाची व्याप्ती वाढविण्यासाठी उपलब्ध असणारे जलस्त्रोत व त्यावर आधारीत कृषीपूरक दुग्ध उत्पादनाच्या योजना जिल्ह्यात आल्या असत्या तर शेतकºयांची दैनावस्था संपली असती. पण, सरकारच्या उदासिन धोरणामुळे चंद्रपूर जिल्हा दूध उत्पादनात मागे पडला आहे.
चार जिल्ह्यांतून दुधाची आयात
शेतीसोबत दुधाळी जनावरांचे पालन करून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. मात्र, जिल्ह्यात मोठी योजना न आल्याने मागणीच्या तुलनेत पुरेसे दुग्ध उत्पादन होत नाही. भंडारा, गोंदिया, वर्धा व नागपूर जिल्ह्यातून दूधाची आयात करून जिल्ह्याची गरज पूर्ण करावी लागत आहे.
आश्वासने कागदावरच
शासकीय दुग्धशाळेत अद्ययावत संयंत्र सोयीसुविधा आहेत. पण, दुग्धोत्पादन क्षमतेपेक्षा कमी आहे. ते पुन्हा वाढू शकते. उपलब्ध संसाधनांचा वापर करून दुग्ध प्रक्रीया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचे आश्वासन राज्याचे दूग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले होते. परंतु तेही कागदावरच राहिले आहे.
संस्थात्मक केंद्रांची उपेक्षा
चंद्रपुरातील दूध डेअरीमध्ये नागभीड व उमरेड येथील शित केंद्रातून दूध आणले जाते. सद्यस्थितीत तीन संकलन केंद्रे बंद आहेत. खासगी दूध कंपन्यांपेक्षा जनतेचा शासकीय दूध खरेदीवर विश्वास आहे. केंद्रातील दुधाची गुणवत्ता उत्तम असली तरी उत्पादन व संकलनासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही. संबंधित यंत्रणा कार्य करते. पण, आर्थिक बळ नाही. संस्थांत्मक केंद्रांची उच्च पातळीवरूनच उपेक्षा केली जात जात आहे. याकरिता संकलन व खरेदी थेट शितकरण संयंत्रातून सोसायटी, जिल्हा संस्था अथवा वैयक्तिक दूध उत्पादकांकडून घेण्यासाठी परवानगी देण्याचा विचारही गुंडाळून ठेवण्यात आला. सरकारकडून दूग्ध उत्पादनासाठी विशेष प्रयत्न होत नसल्याची नाराजी शेतकºयांनी व्यक्त केली आहे.