निवडणूक केंद्रावर विलंबाने पोहोचले कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2017 12:35 AM2017-02-06T00:35:43+5:302017-02-06T00:35:43+5:30

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली.

Delayed cameras at the polling station | निवडणूक केंद्रावर विलंबाने पोहोचले कॅमेरे

निवडणूक केंद्रावर विलंबाने पोहोचले कॅमेरे

Next

शिक्षक मतदार संघ निवडणूक : मतदानापूर्वी व नंतरही काही वेळ नव्हते व्हिडिओ शुटिंग
चंद्रपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान, प्रत्येक केंद्रावर अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रत्येक हालचालीचे व्हिडीओ शूट करणारे कॅमेरामनही प्रशासनातर्फे पाठविले जातात. मात्र यावेळी तब्बल दोन-अडीच तासानंतर जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावर हे कॅमेरे पोहोचल्याची माहिती आहे. यामुळे मतदान केंद्रावर प्रारंभी कुठल्या हालचाली झाल्या, याचे व्हिडिओ शूटच प्रशासनाकडे नसावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला मतदान घेण्यात आले. यासाठी जिल्हाभरात एकूण २७ मतदान केंद्रांची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली होती. यात चंद्रपुरातील ज्युबिली हॉयस्कूल येथील दोन मतदान केंद्रांचा समावेश होता. जिल्ह्यात एकूण ८९.३८ टक्के मतदान झाले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तर यात एक त्रुटी राहिल्याची आता चर्चा होऊ लागली आहे. निवडणूक प्रक्रिया राबविणाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचेही बोलले जात आहे.
मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलिसांचा बंदोबस्त व केंद्रावरील हालचालीचे चित्रीकरण करण्यासाठी कॅमेऱ्यांची व्यवस्था केली जाते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ही जबाबदारी असते. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतदान पेटी दाखविली जाते. मतदान पेटी रिकामी असल्याची खात्री करून घेतल्यानंतर उमेदवारांच्या प्रतिनिधींची स्वाक्षरी घेऊन कागदोपत्री प्रक्रिया पार पाडली जाते. विशेष म्हणजे, या सर्व क्षणाचे कॅमेऱ्याने चित्रीकरणही केले जाते. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात मूल येथील मतदान केंद्र वगळता जिल्ह्यातील इतर मतदान केंद्रावर मतदान सुरू होण्यापूर्वी अशा कॅमेऱ्यांची व्यवस्थाच नव्हती, अशी माहिती आहे.
शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतदानास सुरूवात झाली. यावेळी अनेक मतदान केंद्रावर कॅमेरे नव्हते. शिक्षकांना कर्तव्यावर जायचे असल्याने सकाळपासूनच शिक्षण मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी होती. मतदान सुरू झाल्यानंतर तब्बल दोन-अडीच तासांनी म्हणजेच सकाळी १० ते १०.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील बहुतांश मतदान केंद्रावर आपापले कॅमेरे घेऊन कॅमेरामन पोहचल्याची माहिती आहे. वास्तविक मतदान सुरू होण्यापूर्वीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यांची व्यवस्था केंद्रावर करणे आवश्यक होते. मात्र उदासीनता व निष्काळजीपणामुळे असे होऊ शकले नाही. .
या संदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अर्जुन चिखले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर कॅमेरामन कॅमेऱ्यासह उपस्थित होते, असे सांगितले. कॅमेरामन विलंबाने आले काय, असे विचारले असता त्याने काय फरक पडतो. मतदान शांततेत आणि अगदी वेळेवर सुरू झाले, असेही ते म्हणाले. (शहर प्रतिनिधी)

असे झाले होते केंद्रनिहाय मतदान
चंद्रपूर शहर (एक) ८४.४० टक्के, चंद्रपूर शहर (दोन) ८६.८ टक्के, चंद्रपूर ग्रामीण केंद्रावर ८५.५८ टक्के, माढेळी केंद्रावर ७९. १७ टक्के, वरोरा केंद्र ८९.६०, शेगाव बुज १००, चिमूर ८९.१३, शंकरपूर ८९.६३, नागभीड ९४.५१, ब्रह्मपुरी ९०.३४, गांगलवाडी ९६.८८, तळोधी ९३.१२, नवरगाव ९४.९६, चंदनखेडा ८५, भद्रावती ८९, सिंदेवाही ९५.९२, पाथरी ८८.४६ टक्के, सावली ८९.३६, मूल ९२.३, पोंभूर्णा ९१.८०, बल्लारपूर ८७.३६, राजुरा ९२.६६, कोठारी ९५, गोंडपिंपरी ९१.३८, कोरपना ९५.२९, गडचांदूर ९०.९१ टक्के तर जिवती या केंद्रावर ८८.८२ टक्के मतदान झाले.

Web Title: Delayed cameras at the polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.