दिल्लीतील पारितोषिक प्राप्त चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार : सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 03:59 PM2023-02-04T15:59:03+5:302023-02-04T16:00:17+5:30
मुनगंटीवार यांच्या भेटीने गोंधळी समाजबांधव भारावले
चंद्रपूर : नवीदिल्लीतील प्रजासत्ताक दिनी द्वितीय पारितोषिक मिळविलेला महाराष्ट्राचा "साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती" हा चित्ररथ राज्यातील साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेच्या माध्यमाने नेण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
दिल्लीतील चित्ररथासोबत कर्तव्यपथावर संचलनात गोंधळ सादर करण्यात आला होता. दिल्लीतील संचलनात गोंधळी समाजाला प्रथमच संधी मिळाली त्याबद्दल अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेने ना. सुधीर मुनगंटीवार यांचा आज मंत्रालयात सत्कार केला, त्याप्रसंगी ते बोलत होेते. ते पुढे म्हणाले की, आत्तापर्यंत दिल्लीच्या कर्तव्य पथावर जे चित्ररथ दिसले ते फक्त टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला दिसले. त्यामुळे माहूरची रेणुका माता, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीची सप्तश्रृंगी माता या साडेतीन शक्तीपीठांच्या ठिकाणी रथयात्रेच्या माध्यमातून हा चित्ररथ नेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुनगंटीवार यांनी पुढे सांगितले की गोंधळी समाजामध्ये असणारे जे जे लोककलावंत आहेत ज्यांनी ज्यांनी या समाजाला प्रगत करण्यामध्ये, उन्नत करण्यामध्ये सामाजिक जाणीव ठेवून समरसता निर्माण केली त्या सर्वांच्या पाठीशी शासन म्हणून आम्ही खंबीरपणे उभे आहोत. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या वतीने सादर केलेल्या "साडेतीन शक्तिपीठे व नारीशक्ती" या चित्ररथाला त्यासोबत सादर केलेल्या गोंधळाच्या सादरीकरणाने अधिकच उठाव आला, असेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. या चित्ररथाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देखील प्राप्त झाले आहे.
साडेतीन शक्तीपीठांच्या या चित्ररथाच्या माध्यमातून गोंधळी समाजाला प्रथमच दिल्लीतील कर्तव्य पथावर जाण्याची संधी मिळाली म्हणून उपस्थित समाज बांधवांनी यावेळी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आणि मानाचा फेटा बांधून त्यांचा सन्मान केला.
यावेळी मुनगंटीवार यांनी उपस्थित गोंधळी समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांची व्यक्तिगत चौकशी करत संवाद साधला. मुनगंटीवार यांच्या या भेटीमुळे गोंधळी समाज बांधव भारावून गेल्याचे दिसले. या बैठकीदरम्यान अखिल भारतीय गोंधळी समाज कार्याध्यक्ष राजेंद्र अण्णाराव वनारसे, कर्नाटक गोंधळी समाज प्रदेशाध्यक्ष सिद्राम दादाराव वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.