जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:23 AM2021-05-03T04:23:10+5:302021-05-03T04:23:10+5:30
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून, ...
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून, जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
वाहनावर मोबाईलचा वापर धोकादायक
सिंदेवाही : वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु आजही अनेक जण महामार्गावरील तसेच शहरातील रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करताना दिसून येत आहेत. हा प्रकार त्यांच्या व इतरांसाठीही धोकादायक ठरणारा आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक नाही
कोरपना : राजुरा ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खिर्डी ते राज्य सीमादरम्यानच्या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलक नसल्याने वाहतूकदारांची गैरसोय होत आहे. सदर महामार्ग जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीच्या महामार्गापैकी एक आहे. त्यामुळे दिवस-रात्र या मार्गावरून आवागमन सुरू असते, परंतु दिशादर्शक नसल्याने त्रास होत आहे.
आवळगाव ते कोसंबी रस्त्याची दैनावस्था
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
घुग्घुस : परिसरात वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक शासकीय कामे खंडित होत आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
खासगी शाळांना वाहनतळच नाही
चंद्रपूर : शहरातील काही खासगी शाळांना वाहनतळ नसल्याने विद्यार्थी अगदी रस्त्यावरच सायकल ठेवत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागाने अशा शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांची आहे.
घंटागाडीची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : शहरात दररोज सकाळी घंटागाडीद्वारे कचरा संकलन केला जात आहे. मात्र काही वॉर्डातील घंटागाडींची दुरवस्था झाली आहे. अनेकवेळा कचरा रस्त्यावर सांडत आहे. त्यामुळे स्वच्छतेचे तीनतेरा वाजत आहे. मनपाने याकडे लक्ष देऊन संबंधित विभागाला कचरा ट्राॅली दुरुस्त करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी आहे.
रिक्त पदांमुळे योजना पोहोचल्याच नाही
कोरपना : कृषी विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, विविध पदे रिक्त असल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. सुधारित आकृतिबंधानुसार अनेक पदांना मंजुरी आहे. पण पदभरती झाली नाही. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अडचण जात आहे.
नळ योजनांना तांत्रिक अडचणीचे ग्रहण
ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावात नळ योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वस्तू ठरत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावात नळ योजनेचे पाणी मिळत नाही.
वीज बिलामुळे सामान्य ग्राहक त्रस्त
घुग्घुस : महावितरण कंपनीकडून वारंवार वीज दरवाढ, अतिरिक्त शुल्क तर कधी अतिरिक्त सुरक्षा रकमेची देयके पाठविली जात आहेत. या मनमानी कारभाराने त्रस्त असलेल्या वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
पीक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या चकरा
चिमूर : तालुक्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. पण, विम्याचा लाभ मिळाला नाही. यावर्षी शेतीचे नुकसान झाले. विमा रकमेसाठी शेतकरी कृषी कार्यालयात चकरा मारत आहेत.
चंद्रपूर-वणी मार्गावर पोलीस बंदोबस्त वाढवा
घुग्घुस : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही विविध मार्गाने दारू तस्करी सुरू आहे. पोलीस कारवाई करीत आहे. परंतु, तस्करीच्या घटना वाढतच असल्याचे दिसून येते. पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी आहे.