पालेबारसातील बीट कटाईच्या चौकशीची मागणी
By admin | Published: July 28, 2016 01:34 AM2016-07-28T01:34:48+5:302016-07-28T01:34:48+5:30
वनविकास महामंडळ ब्रह्मपुरी अंतर्गत पालेबारसा वनपरिक्षेत्रात उप क्र. १४६ मध्ये मोठ्या प्रमाणात बीट व लाकूड कटाईचे काम मागील तीन महिन्यांत करण्यात आले.
वनपरिक्षेत्र क्र. १४६ : स्थानिकांना रोजगारापासून डावलले
गेवरा : वनविकास महामंडळ ब्रह्मपुरी अंतर्गत पालेबारसा वनपरिक्षेत्रात उप क्र. १४६ मध्ये मोठ्या प्रमाणात बीट व लाकूड कटाईचे काम मागील तीन महिन्यांत करण्यात आले. त्यात बीट वाहतूकही जंगल ते डेपो अशी झाली. त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून बीट वाहतूक करणाऱ्या स्थानिक ट्रॅक्टर मालकांना व मजुरांना केलेल्या कामाची रक्कम अदा करण्यात आली नसल्याची तक्रार ट्रक्टर मालकांनी वरिष्ठ प्रशासन व पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांच्याकडे केली आहे.
ब्रह्मपुरी विभागात मोठ्या प्रमाणात यावर्षी बीट व इमारती लाकूड कटाई करण्यात आली. त्या अनुषंगाने नियमानुसार जंगल कामगार सोसायट्यामार्फत कटाईची कामे केली जातात. बीट वाहतूक खाजगी वाहतूक ठेकेदारांमार्फत केली जाते. त्यासाठी वनविकास महामंडळाने आॅनलाईन अर्ज मागविले. मात्र विभागीय परिक्षेत्रातील बीट वाहतुकीचे कंत्राट एकाच कंत्राटदाराला दिले. सदर कंत्राटदार हा यापूर्वी वनविकास महामंडळातील सिंदेवाही परिक्षेत्रात सागवान वृक्षतोड व वाहतूकप्रकरणात अडकला आहे. त्याचे ट्रक्टरही विभागाकडे जप्त आहेत. तरीही या कंत्राटदाराचे कंत्राट आॅनलाईनच्या नावाखाली मंजूर झाले. स्थानिक मजूर व ट्रॅक्टर मालकांना परिसरातील वनातील कामे मागितली असता ७० ते ७५ मजूर आणि आठ ट्रॅक्टर मालकांना बीट वाहतुकीचे कंत्राट दिले. बीट वाहतूकही करारानुसार झाली. कामावरील परिसरातील ट्रॅक्टर मालकांनी काशिराम दाजगाये यांच्या नावे वाहतुकीचे बिल काढण्यासाठी लेखी संमतीपत्र दिले. परंतु वनविकास महामंडळाने या कामाचे बिल मुख्य कंत्राटदाराच्या नावे काढले आहे. त्यामुळे संबंधितांना मजुरीसाठी संघर्ष करावा लागत आहे. याबाबत दाजगाये यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली. परंतु सदर माहिती उपलब्ध करुन न दिल्याने यात गौडबंगाल असल्याचा आरोप होत आहे.