बाजारात शीतपेयाची मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:41 PM2019-04-14T22:41:09+5:302019-04-14T22:41:32+5:30
उन्हाची दाहकता कमी शमवण्यासाठी अनेकजण आईस्क्रीम खाणे वा थंडपेय पिणे पसंत करतात. सध्या शहरातील विविध भागात थाटलेल्या आईस्क्रीम पार्लर व रसवंतीच्या दुकानांवर नागरिक व विशेषत: बच्चे कंपनीची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. यातून अनेकांना हंगामी रोजगार मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आयुधनिर्माणी (भद्रावती): उन्हाची दाहकता कमी शमवण्यासाठी अनेकजण आईस्क्रीम खाणे वा थंडपेय पिणे पसंत करतात. सध्या शहरातील विविध भागात थाटलेल्या आईस्क्रीम पार्लर व रसवंतीच्या दुकानांवर नागरिक व विशेषत: बच्चे कंपनीची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. यातून अनेकांना हंगामी रोजगार मिळाला आहे.
अलिकडे सूर्य आग ओकायला लागला आहे. या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. साहजिकच यापासून थंडावा लाभावा, यासाठी उन्हाळ्यात थंड पदार्थ खाण्याकडे व शितपेय पिण्याकडे सर्वाधिक कल दिसून येत आहे. नागरिकांची पसंती लक्षात घेऊन चतूर दुकानदार विविध कंपन्यांचे आईस्क्रीम, ज्युस, लस्सी, कुल्फी, चोकोबार तथा शितपेयाची दुकाने मोठया प्रमाणात थाटतात. ऊसाच्या ताज्या रसाची रसवंतीची व लिंबू शरबताच्या गाड्याही मोठया प्रमाणावर लावल्या जातात. शहरात खाद्यपदार्थांच्या दुकानांप्रमाणेच आईस्क्रीम पार्लरची संख्याही मोठया प्रमाणात वाढली आहे. आईस्क्रीमनंतर लस्सी व चोकोबारला बच्चे कंपनी जास्त पसंती देत असल्याचे दिसून येते. अमुक कंपनीचेच आईस्क्रीम ग्राहकांपर्यंत जावे, यासाठी नामांकित कंपन्या आईस्क्रीम विक्रेत्यांना विशेष पॅकेज देत आहेत. या पॅकेजमध्ये डिप फ्रीज, दुकानाला लागणारे फर्निचर आदी सोयीसवलतींचा अंतर्भाव असल्याचे सांगितले जाते. वीजदर वाढल्याने मागील दोन तीन वर्षांपासून आईस्क्रीम व्यवसाय डबघाईस आला आहे. सध्या बाजारात दहा रुपयांपासून शंभर सव्वाशे रुपये पर्यंत किमतीचे आईस्क्रीम बाजारात खवय्यांसाठी उपलब्ध आहे. तप्त उन्हाळा सुरू झाला. त्यामुळे भद्रावती शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला पायनापल ज्युस, लस्सी, उसाचा रस, लिंबू शरबताची दुकाने मोठया प्रमाणात थाटली आहे. या हंगामी दुकानात थंड पदार्थ थोडे स्वस्त भावाने मिळत असल्याने ग्राहकांचा कल या दुकानांकडेही आहे. विद्युत बिलांमुळे हा व्यवसाय काहीप्रमाणात आर्थिक कोंडीत सापडला. शहरात उन्हाळ्याव्यतिरिक्त बाराही महिने आईस्क्रीम खाणारा वर्ग असल्याचे शहरात दिसून येते.
वीज दरवाढीचा फटका
अनेक कुटुंबात जेवण केल्यानंतर अथवा कौटुंबिक उत्सवप्रसंगी स्वीट डिश म्हणून आईस्क्रीम खाण्याची पध्दत रूढ झाली आहे. मात्र दीर्घकाळ विद्युत पुरवठा खंडित असल्यास या व्यवसायात नुकसान होत असते. वीजदरवाढ होत राहिल्यास आगामी हा व्यवसाय गुंडाळल्याशिवाय पर्याय नाही, अशी माहिती एका विके्रत्याने ‘लोकमत’ शी बोलताना दिली. या व्यवसायात अनेकदा आर्थिक नुकसान होते. पण हंगामी रोजगारासाठी हा व्यवसाय चांगला पर्याय आहे, असेही त्यांनी सांगितले.