सिमेंटीकरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:32 AM2021-01-08T05:32:25+5:302021-01-08T05:32:25+5:30

बँकेचे कर्ज माफ करण्याची मागणी चंद्रपूर : बेरोजगारीवर मात करून ऑटोचालकांनी व्यवसाय उभा केला आहे. मात्र कोरोना संकटामुळे त्यांच्यावर ...

Demand for cementation | सिमेंटीकरणाची मागणी

सिमेंटीकरणाची मागणी

Next

बँकेचे कर्ज माफ करण्याची मागणी

चंद्रपूर : बेरोजगारीवर मात करून ऑटोचालकांनी व्यवसाय उभा केला आहे. मात्र कोरोना संकटामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. ऑटोसाठी घेतलेले कर्ज फेडणे कठीण झाले आहे. त्यामुळे ऑटोरिक्षा चालकांचे बँक कर्ज माफ करण्याची मागणी केली जात आहे.

ग्रामीण भागातील घरकूल बांधकाम रखडले

चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शेकडो नागरिकांना घरकूल मंजूर झाले. परंतु पंचायत समितीच्या नियोजनशून्यतेमुळे धनादेश मिळाले नाहीत. शेकडो लाभार्थी घरकुलासाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवित आहेत. मात्र, धनादेश मिळाला नाही. काही व्यक्तींची नावे चुकीने वगळण्यात आली. दरम्यान, कोरोनामुळे टाळेबंदी लागल्याने प्रशासकीय कामे ठप्प झाली. त्यामुळे घरकूल बांधकाम निधीअभावी रखडली आहेत.

मजुरी कमी असल्याने आर्थिक अडचण

चंद्रपूर : कोरोनामुळे यावर्षी बांधकाम क्षेत्र प्रभावित झाले आहे. अनेकांनी घर बांधकाम करण्याचा बेतही पुढे ढकलला आहे. मात्र जे बांधकाम सुरू आहे त्यामध्ये मजुरांना अत्यल्प मजुरी दिली जात असल्यामुळे मजुरी वाढवून देण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

पडोली परिसर प्रदूषणामुळे त्रस्त

पडोली : परिसरातील विविध उद्योगांमुळे नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. हा परिसर एमआयडीच्या हद्दीत येतो. या ठिकाणी विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही दिवसांपूर्वी उद्योग व्यवस्थापनांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, प्रदूषण रोखण्यासाठी अद्याप उपाययोजना केल्या नाही.

रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा कोलमडली

चिमूर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली आहे़ बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे़ आर्थिक परिस्थितीमुळे खासगी रुग्णालयात जाणे शक्यच नाही़ शासनाकडून आरोग्य केंद्रांना मोठा निधी दिला जात आहे़ पण, मूलभूत सुविधा मिळत नसल्याने रुग्ण हैराण झाले आहेत.

सौर ऊर्जेचे कुंपण अनुदानावर द्यावे

चिमूर : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जंगलाला लागून आहेत. वन्य प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. शिवाय, वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत. लॉकडाऊन असले तरी शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करत आहेत. अशावेळी वन्यप्राण्यांचे हल्ले होऊ शकतात. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी वनविभागाने शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवलरी कुंपण किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांकडे केली आहे.

घुग्घूस तालुका निर्मितीचा प्रश्न प्रलंबित

घुग्घुस : जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या घुग्घुस शहराला तहसीलच्या दर्जा देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. घुग्घुस हे औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. चंद्रपूर तालुक्याचा वाढता कारभार बघता स्वतंत्र तालुक्याची निर्मिती करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

देऊरवाडा येथील तीर्थक्षेत्राचा विकास करावा

भद्रावती : तालुक्यातील देऊरवाडा येथे अनेक धार्मिक ठिकाणे आहेत. त्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन येथील पायाभूत विकास घडवून आणावा, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी सुविधा पुरविण्यात आल्यास येथील पर्यटन विकास साधला जाईल.

चिमूर - नंदोरी मार्गावर बसफेऱ्या वाढवा

खडसंगी : चिमूर येथून कोरा मार्गे नंदोरीसाठी बसफेऱ्या वाढविण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. या मार्गावर अत्यल्प बसेस असल्याने प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागते. याचा फटका सर्वसामान्य येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना बसतो आहे.

गंजवॉर्ड परिसरातील रस्त्यावर दुर्गंधी

चंद्रपूर : येथील गंजवाॅर्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारील चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावरून नागरिकांची येजा सुरू असते. मात्र दुर्गधीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा

गडचांदूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरती बंद असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे.

मत्स्य व्यावसायिकांचे अर्थसाहाय्य अडले

वरोरा : जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद मालगुजारी तलावात मत्स्यपालन करतात. मात्र, योजनेचे अर्थसाहाय्य अद्याप मिळाले नाही. संबंधित विभागाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी मत्स्यपालन संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

व्यायाम शाळा उभारण्याची मागणी

सिंदेवाही : तालुक्यातील काही गावात व्यायामशाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायमशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. सिंदेवाही तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत. मात्र अजूनही काही गावांत व्यायामशाळा नाही. यावर्षी कोरोनामुळे व्यायाम केंद्रावर निर्बंध आले आहेत. मात्र भविष्यात गावातील युवकांना व्यायाम करण्यासाठी सोपे होईल.

पडोली चौकातील अतिक्रमण हटवा

पडोली : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर असलेल्या पडोली चौकात काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. सध्या संचारबंदी असल्यामुळे सदर चौकामध्ये गर्दी कमी आहे. असे असले तरी अन्य वेळी हा चौक सतत गजबजलेला असतो. त्यामुळे या चौकातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

पांदण रस्त्यांवर अतिक्रमण वाढले

ब्रह्मपुरी : तालुक्यातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते व गावाची शिव आता संकटात आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी पक्के रस्ते तयार करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोंडवाड्यातील जनावरे असुरक्षित

नागभीड : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहेत. मात्र सध्या या कोंडवाड्याची दुरवस्था झाली आहे. कोंडवाड्यामध्ये चारा आणि जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय करणे अत्यावश्यक आहे. मात्र ती करण्यात येत नसल्याने ती जनावरे असुरक्षित आहेत.

आठवडी बाजारात सुविधांचा अभाव

चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आठवडी बाजार भरतो. या बाजाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असली तरी बहुतांश बाजारांमध्ये सोयीसुविधा नसल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात तर अनेक बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण होते.

Web Title: Demand for cementation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.