पुण्यापाठोपाठ चंद्रपूरचेही चांदागड करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 02:15 PM2018-11-15T14:15:04+5:302018-11-15T14:16:56+5:30

पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने रेटली आहे. त्यापाठोपाठ आता गोंड राजाची राजधानी असलेल्या चंद्रपूरचेही मूळ नाव चांदागढच करावे, अशी मागणी आदिवासी संघटनांकडून पुढे करण्यात आली आहे.

Demand for changing the name of Chandrapur | पुण्यापाठोपाठ चंद्रपूरचेही चांदागड करण्याची मागणी

पुण्यापाठोपाठ चंद्रपूरचेही चांदागड करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देआदिवासी अस्मितेचा प्रश्न चंद्रपूर होती गोंड राजाची राजधानी चांदागढ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने रेटली आहे. त्यापाठोपाठ आता गोंड राजाची राजधानी असलेल्या चंद्रपूरचेही मूळ नाव चांदागढच करावे, अशी मागणी आदिवासी संघटनांकडून पुढे करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबादचे नाव बदलण्याची भाषा करताच देशभरात चर्चा सुरू झाली. शहरांची नावे बदलण्याची मोहीमच सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातच संभाजी ब्रिगेडने पुण्याचे जिजापूर नामकरण सुचविले आहे. त्यापाठोपाठ आदिवासी संघटनांनी आता चंद्रपूर शहराचे नाव चांदागढ करण्याची मागणी पुढे केली आहे.
पूर्वी चांदागढचे गोंड राज्य होते. इंग्रजांनी चांदागढावर आक्रमण करून हे राज्य ताब्यात घेतले. प्रशासकीय कामासाठी १८५९ मध्ये चांदा जिल्ह्याची निर्मिती केली. त्यात मुल, वरोरा, ब्रम्हपुरी या तीन तालुक्यांची निर्मिती करून समावेश केला. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ११ जानेवारी १९६४ रोजी चांदाचे नामांतर चंद्रपूर असे करण्यात आले. त्यासाठी शासन निर्णय क्र. एन.एम.सी.१०६३ बी निर्गमित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे बल्लाळसिंह या गोंड राजाच्या नावावरून त्याच्या राजधानीला बल्लारशहा असे नाव होते. आज त्या शहराला बल्लापूर नावाने ओळखले जाते.

गोंडवाना एक्सप्रेसचे नाव का बदलले?
ज्या पद्धतीने नावे बदलली जात आहे किंवा बदलण्याची मागणी होत आहे, त्याचा फटका प्राचीन गोंडवाना साम्राज्यातील शहरे, रेल्वेस्थानक व रेल्वेगाड्यांच्या नावांना बसत आहे. गोंडवाना या अस्मिताप्रधान शब्दालाही फटका बसत असल्याची खंत बिरसा क्रांतीदलाने व्यक्त केली आहे. भोपाळमधील बैरागढ रेल्वेस्थानकाचे नाव बदलून हिरदाराम करण्यात आले. ३१ मार्च २०१३ रोजी हजरत निजामुद्दीन जबलपूर गोंडवाना एक्सप्रेसचे नाव व नंबरसुद्धा बदलविण्यात आला आहे. पूर्वी १२४११ व १२४१२ या दोन क्रमांकाच्या रेल्वे हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस या नावाने जबलपूरपासून दिल्लीपर्यंत धावत होत्या. आता मात्र या गाडीचा नंबर २२१८१, २२१८२ असा करण्यात आला. जबलपूर हजरत निजामुद्दीन सुपर एक्सप्रेस असे नामांतर करून गोंडवाना शब्द वगळण्यात आला आहे. त्यामुळे गोंडवानातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातील आदिवासी समाजात रोष आहे.

गौरवशाली इतिहासाचे विस्मरण
नावे बदलण्याच्या प्रक्रियेत आदिवासींचा गौरवशाली इतिहास पुसला जात आहे. गढामंडला, चांदागढ, देवगढ, खेरलागढ या ठिकाणी गोंड राजाची राज्ये होती. आज त्यांचीच ओळख पुसली जात आहे, अशी खंत आदिवासी अभ्यासक प्रमोद घोडाम यांनी व्यक्त केली.

रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार करुन गोंडवाना एक्सप्रेस नाव बदलल्याबाबत जाब विचारला जाईल. गोंडवाना एक्सप्रेस आणि चंद्रपूरबाबत बिरसा क्रांती दल देशभर जनआंदोलन उभे करेल.
- दशरथ मडावी,
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, बिरसा क्रांतीदल

Web Title: Demand for changing the name of Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.