नुकसान भरपाई देण्याची मागणी
By Admin | Published: July 16, 2016 01:21 AM2016-07-16T01:21:00+5:302016-07-16T01:21:00+5:30
तालुक्यातील मानोरा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताची शेती करतात. रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पऱ्ह्याची लागवड केली.
तहसीलदारांना निवेदन : मानोरा परिसरात भाताचे नुकसान
बल्लारपूर : तालुक्यातील मानोरा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताची शेती करतात. रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पऱ्ह्याची लागवड केली. मात्र संततधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी मानोरा येथील सरपंच सविता धोडरे यांनी बुधवारी तहसीलदार विकास अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
बल्लारपूर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ११३२.२१ मिमी इतके आहे. जून-जुलै महिन्यात आजतागायत ९२० मिमी इतके पर्जन्यमान झाले आहे. पाच दिवसांच्या संततधार पावसाने मानोरा परिसरातील भाताचे पऱ्हे नेस्तनाबूत झाले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. भाताची रोवणी करण्यासाठी दुबार पऱ्हे टाकण्याची वेळ आली आहे. बी-बियाणे, खते, मजुरी व शेतीच्या मशागतीचा खर्च दुसऱ्यांदा करावा लागणार आहे. यामुळे मानोरा परिसरातील धान उत्पादक शेतकरीवर्ग पुरता संकटात सापडला आहे.
मानोरा भागात मुख्य व्यवसाय शेतीचा असून गावाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने हातात येणारे पीक नष्ट झाले. परिणामी शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत.
दुबार पेरणी करण्यासाठी बी-बियाणे व आर्थिक मदत पीडित शेतकऱ्यांना देण्याची मागणी तहसीलदार विकास अहीर यांना दिलेल्या निवेदनातून मानोरा येथील सरपंच सविता धोडरे यांनी केली आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व बल्लारपूर पंचायत उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांनी केले. यावेळी माजी सभापती अॅड. हरिश गेडाम, मानोरा येथील सरपंच सविता धोडरे, दहेलीचे सरपंच ज्ञानेश्वर टेकाम, कोर्टीमक्ताचे उपसरपंच गोविंदा उपरे, धोडरे व परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)