बँकेतील अफरातफरप्रकरणी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:28 AM2021-05-26T04:28:49+5:302021-05-26T04:28:49+5:30
गोंडपिपरी तालुका हा अतिशय मागास म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील कुटुंबे शेती व शेतीसह पूरक व्यवसाय करीत आपला उदरनिर्वाह करीत ...
गोंडपिपरी तालुका हा अतिशय मागास म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील कुटुंबे शेती व शेतीसह पूरक व्यवसाय करीत आपला उदरनिर्वाह करीत आहेत. अशाही परिस्थितीत भविष्याचा विचार करीत कसेबसे चार पैसे बचत करीत आहेत. बचत केलेली रक्कम भं. तळोधी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अनेकांनी जमा केली. दरम्यान, भंगाराम तळोधी येथील मल्ला पोचू बोर्लावार हे स्वतःच्या बँक खात्यातील रक्कम काढण्यासाठी गेले. मात्र बचतीतील मोठी रक्कम खात्यात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर काही रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. ही बाब उघडकीस येताच अनेक खातेदारांनी आपापले खाते तपासण्यास सुरुवात केली. या वेळी अनेकांच्या खात्यातील रक्कम गहाळ झाल्याचे उघडकीस आले. खातेदारांनी योग्य चौकशी करून बँक व्यवस्थापकाविरोधात कार्यवाही करण्याची मागणी केली होती. या घटनेला अनेक दिवस उलटून गेले. मात्र अद्यापही कार्यवाही झाली नाही. दरम्यान, खातेदार मल्ला पोचू बोर्लावार, बिरा पोचू मुर्कीवार, आशाताई गिरीधर चौधरी, सुरेश तुकाराम बचाले, मनीषा संजय अलगमकार, मंगला मुक्तेश्वर बडगे, विलास तुळशीराम बडगे, विजय मंगरू झाडे, सद्गुरू स्वयंसहायता समूह गट आदींनी तहसीलदार के.डी. मेश्राम यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. बँक व्यवस्थापकाविरोधात त्वरित कार्यवाही करण्यात यावी; अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.