पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:32 AM2021-09-06T04:32:14+5:302021-09-06T04:32:14+5:30
गेवरा : शासनाच्या गृहविभागाचा गावस्तरावरील नागरिक व पोलीस प्रशासनाकरिता एक महत्त्वाचा समन्वयाचा दुवा ठरणारे गावपातळीवरील पोलीस पाटील ...
गेवरा : शासनाच्या गृहविभागाचा गावस्तरावरील नागरिक व पोलीस प्रशासनाकरिता एक महत्त्वाचा समन्वयाचा दुवा ठरणारे गावपातळीवरील पोलीस पाटील हे महत्त्वाचे पद आहे. महत्त्वाची गावपातळीवरील पोलीस पाटलांची रिक्त असणारी पदे अनेक वर्षांपासून भरलेली नाहीत. त्यामुळे पोलीस प्रशासनावरील ताण वाढला आहे. रिक्त पदांची जबाबदारी विद्यमान पोलीस पाटलांवर पडत असल्याची बाब समोर येत आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी मूल अंतर्गत येणाऱ्या पाथरी पोलीस स्टेशन हद्दीत एकूण ३९ महसुली गावे येतात. यात एकूण ३६ पोलीस पाटलांची पदे मंजूर आहेत. यापैकी १३ पोलीस पाटलांची पदे गृहविभागाच्या नियमाप्रमाणे सेवा समाप्तीनंतर रिक्त झाली आहेत. उरलेल्या २३ गावांतील पोलीस पाटील कर्तव्यात आहेत. रिक्त असलेल्या १३ गावांचा अतिरिक्त कारभार असलेल्या जवळच्या गावांतील पोलीस पाटलांकडून जबाबदारी पार पाडली जात आहे. प्राप्त माहितीनुसार कर्तव्यातील संबंधित पोलीस पाटलांचेही मानधन थांबल्याने आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या पोलीस पाटलांना अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.