चंद्रपूर जिल्ह्यातील कोळशाची मागणी वाढली; दररोज १ लाख २० हजार टनाची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2022 07:24 PM2022-05-07T19:24:26+5:302022-05-07T19:26:02+5:30
Chandrapur News देशातील अनेक राज्यांमध्ये वीजटंचाई निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कोळशाची मागणी अचानक वाढली.
चंद्रपूर : देशातील अनेक राज्यांमध्ये वीजटंचाई निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कोळशाची मागणी अचानक वाढली. सद्य:स्थितीत मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्यात दररोज सुमारे १ लाख २० हजार टन कोळशाची वाहतूक केली जात आहे.
चंद्रपूर जिल्हा वीज उत्पादक म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील कोळसा देशातील अनेक महाऔष्णिक केंद्रांना पुरविला जातो. उन्हाळ्यामुळे सध्या विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली. त्यातच देशात वीजटंचाई निर्माण झाल्याने विदर्भातील या खाणीतून कोळशाचा पुरवठा अचानक वाढला.
विदर्भातील खाणीतून २७ मालगाड्यांनी विद्युत केंद्रांमध्ये कोळसा पुरवठा केला जात आहे. मालगाडीच्या ३१ फेऱ्या झाल्या आहेत. दरदिवशी ३१ फेऱ्यांनी कोळसा विद्युत केंद्रात पोहोचविणे सुरू आहे. एका मालगाडीत सुमारे ४ हजार टन कोळसा वाहतूक होताे. काही महिन्यांपूर्वी मालगाडीतून दररोज १ लाख १२ हजार टन कोळसा वीज केंद्रांना पुरविला जात होता. त्यात मोठी वाढ झाली. आता १ लाख २० हजार टन कोळसा पुरवठा होत आहे. महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्यातही चंद्रपुरातील खाणींचा कोळसा पाठविण्यात येत आहे.
आठ खाणींतून सर्वाधिक कोळसा पुरवठा
चंद्रपूर, बल्लारपूर, बाबूपेठ, माजरी, घुग्घुस, वणी, जुनारदेव व उमरेड येथील खाणींतून मोठ्या प्रमाणात कोळसा काढला जात आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली. त्यातून कोळसा टंचाई निर्माण झाली. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींचे उत्पादन दुप्पटीने वाढले.