पकडीगुड्डम धरणाचे पाणी शेतकऱ्यांना देण्याची मागणी
By admin | Published: November 29, 2014 11:19 PM2014-11-29T23:19:11+5:302014-11-29T23:19:11+5:30
कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम मरकागोदी धरणाचे पाणी १२ गावांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तात्काळ देण्याची मागणी सोनुर्ली (वनसडी) येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आस्वले
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम मरकागोदी धरणाचे पाणी १२ गावांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तात्काळ देण्याची मागणी सोनुर्ली (वनसडी) येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आस्वले तथा शेतकऱ्यांनी एका लेखी निवेदनातून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
पकडीगुड्डम-मरकागोंदी धरणाखाली लाभक्षेत्रात १२ गावे असून सिंचनाखाली २६८० हेक्टर क्षेत्र आहे. परंतु सदर धरणातील एकूण पाण्यापैकी ३/४ पाणी अंबुजा सिमेंट कंपनीला देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतपिकांसाठी सिंचनासाठी पाणी मिळत नाही. मिळाले तरी अपुरे मिळते. त्यामुळे उत्पन्न मिळत नाही.
या धरणाचे पाणी शेतपिकांना मिळण्यासाठी तीन ते चार वेळा चक्का जाम आंदोलन केले. शेतकऱ्यांवर अजुनही कोर्टात कारवाई सुरू आहे. अंबुजा सिमेंट कंपनीला पकडीगुड्डम धरणाचे पाणी देण्याबाबतचा १२ वर्षांचा करार शासनाने केला होता. मात्र तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत आठ वर्षाचा करार केला होता व कंपनीने पैनगंगा नदीवरुन पाणी घेण्याचे निर्देश दिले होते. करार संपून सुद्धा धरणाचे पाणी कंपनीला देणे सुरू असल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळणे अशक्य झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शासनाने याबाबत दखल घेऊन पकडीगुड्डम धरणाचे पाणी सिमेंट कंपनीला पुरविणे तात्काळ थांबवावे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तात्काळ पाणी द्यावे अशी मागणी पुरुषोत्तम आस्वले तथा १२ गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
लोकप्रतिनिधींनी सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रति ना. सुधीर मुनगंटीवार, ना. हंसराज अहीर, आ. संजय धोटे, उपविभागीय अधिकारी राजुरा, तहसिलदार कोरपना, ठाणेदार कोरपना यांच्याकडे पाठविल्या आहेत. (वार्ताहर)