जिल्ह्यात प्रदूषण भत्ता लागू करण्याची मागणी
By Admin | Published: January 22, 2015 12:49 AM2015-01-22T00:49:27+5:302015-01-22T00:49:27+5:30
चंद्रपूर हा राज्यातील सर्वाधिक प्रदूषण असलेला जिल्हा आहे. नागरिकांच्या आरोग्यावर प्रदूषणाचे विपरीत परिणाम होत आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर हा राज्यातील सर्वाधिक प्रदूषण असलेला जिल्हा आहे. नागरिकांच्या आरोग्यावर प्रदूषणाचे विपरीत परिणाम होत आहे. यासाठी जिल्ह्यात प्रदूषण भत्ता व नक्षलग्रस्त भत्ता १५ तालुक्यांना लागु करावा व केंद्र शासनाने लागु केलेला ७ टक्के महागाई भत्ता राज्यातील कर्मचाऱ्यांना लागु करावा या मागण्यांसाठी विविध संघटनांच्या कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोेलन करण्यात आले. या आंदोलनाला महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित समर्थन व सहभाग दर्शविला.
जिल्ह्यात नक्षलवादी कारवाया पूर्णपणे बंद झाल्या नाही. छुप्या नक्षलचळवळींचा जोर अद्याप ओसरला नसताना तसेच जिल्ह्यातील नक्षलसेलही बंद झाला नसताना अचानक नक्षलग्रस्त भत्ता मात्र बंद करण्यात आला. यामुळे पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांच्या मानसिक व आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे हा भत्ता जिल्ह्यातील १५ ही तालुक्यांना तत्काळ लागु करण्यात यावा, तसेच प्रदूषणामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांचे आयुष्यमान दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा विचार शासनाने करावा व ज्या जिल्ह्यातून कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो, त्यापैकी काही निधी जिल्ह्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी खर्च करणे अपेक्षित आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हाभर प्रदूषण भत्ता लागु करण्यात यावा, या प्रमुख मागण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध १८ संघटनांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी कुलसंगे यांना शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्त्व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले, जगदीश जुनघरी, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे नरेंद्र बोबडे, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षण समितीचे विजय भोगेकर, दीपक वऱ्हेकर, नारायण कांबळे, हरिश ससनकर यांनी केले. या आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)