जि.प.मधील मत्स्य विभाग स्वतंत्र करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:00+5:302021-07-10T04:20:00+5:30
चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय करणाऱ्या १०५ सहकारी संस्था असतानाही जिल्हा परिषदमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय ...
चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय करणाऱ्या १०५ सहकारी संस्था असतानाही जिल्हा परिषदमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय योजना दिल्या जात आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांना लाभ मिळत नसल्याने जिल्हा परिषद चंद्रपूरमध्ये मत्स्य विभाग स्वंतत्र करण्याची मागणी मच्छीमार नेते डॉ. दिलीप शिवरकर यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १०५ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था आहेत. या व्यवसायावर संस्था सदस्यांच्या व्यतिरिक्त मासेमारी करणारा ढिवर समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्याने आहे. परंतु आजपर्यत मूळ व प्राथमिक व्यवसाय मच्छीमारी असल्यामुळे या व्यवसायात विकास न झाल्यामुळे समाजाचा विकास होऊ शकला नाही.
मामा तलावाच्या माध्यमातून ७० टक्के ते ८० टक्के व्यवसाय केला जातो. सर्व मामा तलाव जि.प. अंतर्गत येतात. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेचा विकास करण्याकरिता जि.प.ची फार मोठी जबाबदारी असते. ढिवर समाजाच्या विकास संदर्भात अनेकदा जि.प.ला निवेदन दिली.
मत्स्य व्यवसाय विभाग कृषी व पशुदुग्ध व मत्स्य व्यवसाय असा संमिश्र विभाग असल्याने शासकीय पातळीवरील विविध योजनांचा शासकीय निधी कृषी विभागावर खर्च केला जातो व मत्स्य व्यवसाय सदैव दुर्लक्षित राहतो. त्यामुळे मत्स्य व्यवसाय हा स्वतंत्र विभाग केल्यास मत्स्य व्यवसायाचा व त्यावर अवलंबून असलेल्या ढिवर समाजाचा सर्वांगीण विकासासाठी वित्तीय योजना तयार करता येईल व त्या माध्यमातून समाजाचा विकास साध्य होईल. त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये मत्स्य व्यवसाय विभाग स्वतंत्र करण्याची मागणी डॉ. दिलीप शिवरकर व जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे सदस्य विजय नान्हे यांनी केली आहे.