स्वतंत्र विद्युत फिडर लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2017 12:44 AM2017-01-14T00:44:36+5:302017-01-14T00:44:36+5:30
राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे मागील दोन वर्षापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होता. परिणामी नागरिक त्रस्त झाले
मुख्य अभियंत्याला निवेदन : विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
विरूर (स्टे) : राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे मागील दोन वर्षापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होता. परिणामी नागरिक त्रस्त झाले त्यामुळे विरूर येथे स्वतंत्र विद्युत फिडर लावण्याच्या मागणीचे निवेदन चंद्रपूर येथील मुख्य अभियंता यांना बुधवारला देण्यात आले आहे.
राजुरा तालुक्यामध्ये विरूर परिसर हा आदिवासी व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जातो. तालुक्यातील विरूर स्टेशन हे गाव मोठे असून येथील लोकसंख्या दहा हजाराच्यावर आहे. याठिकाणी पोलीस ठाणे, वन विभाग कार्यालय, शाळा-महाविद्यालये तसेच अनेक शासकीय कार्यालये आहेत. तसेच येथे आठवडी बाजार भरत असून परिसरातील मुख्य बाजारपेठ आहे.
१५ वर्षापूर्वी विरूर येथे २२० केव्ही व ३३ केव्ही विद्युत केंद्र उभारण्यात आले. त्यामुळे विरूर व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आतातरी वीज पुरवठा सुरळीत राहिल. अशी अपेक्षा नागरिकांना होती.मात्र ही आशा फोल ठरली. वीजेचा लपंडाव सुरूच होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई भासत असून महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी रोष निर्माण झाला आहे.
सततचा विजेच्या कमी अधिक दाब व सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे वीज उपकरणात बिघाड होत आहे.त्यामुळे नागरिकांचे नुकसानही होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत.
मागील कित्येक महिण्यांपासून वीज पाच मिनीटे राहते, तर अर्ध्या तासातच गायब होते. दिवसांतून किती वेळा वीज जाते. आणि येते यांचा अंदाजसुद्धा बांधता येत नाही. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या व्यवसायीकांचे धंदे डबघाईस आले आहेत. त्यातच वारंवार बंद होणाऱ्या विजेमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. तसेच विजेवर चालणारे उद्योग धंदे चौपट झाले आहे. त्याचबरोबर आटाचक्की, कांडप केंद्र, एसटीडी केंद्र, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु विकणारे व दुरुस्त करणारे आदी धंदे धोक्यात आले आहे. बँकेचे व्यवहार, दुकाने, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच कार्यालयीन कामे हे आॅनलाईन झाले असल्याने विजेचा लपंडावाने जनजीवन प्रभावीत झाले आहे. मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे त्रस्त नागरिकांनी मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन विरूर येथे स्वतंत्र विद्युत फिडर लावण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात विरूर येथील सरपंच भास्कर सिडाम, जि.प. सदस्य अविनाश जाधव, अजय रेड्डी, मनोज सारडा, विलास आक्केवार, किट्टी बवेजा, व्यापारी अध्यक्ष संतोष ढवस, बबलू सोनी, शामराव कस्तुरवार आदी नागरिक होते. (वार्ताहर)