ब्रह्मपुरी तालुक्यातील मनरेगा कामाची चौकशी करण्याची मागणी
By admin | Published: July 13, 2015 01:12 AM2015-07-13T01:12:25+5:302015-07-13T01:12:25+5:30
पिंपळगाव (भो) येथील मनरेगा कामातील झालेल्या भ्रष्टाचाराची लक्तरे उघडकीस येऊन लाखो रुपयाची अफरातफर ....
कामात गैरव्यवहार : मजुरांना कामच नाही
ब्रह्मपुरी : पिंपळगाव (भो) येथील मनरेगा कामातील झालेल्या भ्रष्टाचाराची लक्तरे उघडकीस येऊन लाखो रुपयाची अफरातफर झाल्याचे निदर्शनास आल्याने संपूर्ण ब्रह्मपुरी तालुक्यात झालेल्या मनरेगा कामाची चौकशी केल्यास कोट्यावधींचे घबाड बाहेर येऊ शकतो. यातून मजुरांना भविष्यात न्याय मिळू शकतो. त्यामुळे मनरेगा कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शासनाने मजूरांच्या हाताला काम मिळावे म्हणून मनरेगा सारखी योजना सुरू केली. मजुरांना काम मिळाले, परंतु त्या कामात मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याचे मजुरांच्या तक्रारी आहेत. योजनेचा थेट लाभ त्या मजुरांना मिळावे म्हणून आॅनलाइन, पासबुकाच्या माध्यमातून कामाचा मोबदला जमा करण्याची पद्धती अवलंबविले असतानाही इच्छा तेथे मार्ग याप्रमाणे भ्रष्टाचार केला जात आहे. पिंपळगाव (भो) येथे चक्क ग्राम रोजगाराचे नाव मस्टरमध्ये समाविष्ठ झाल्याने या योजनेत पुन्हा काय होऊ शकत नाही, याचा पुरावाच दिल्या गेला आहे. ग्रामीण भागातील जनता गावच्याच व्यक्तीवर भरवसा ठेवून काम करतात. परंतु, तोच त्यांचा आर्थिक घात करतो, हे या प्रकरणावरुन उघडकिस आले आहे. पिंपळगाव(भो) हे गाव याला एकमेव अपवाद नाही तर अनेक गावखेड्यात यापेक्षाही मोठा भ्रष्टाचार या रोहयो अंतर्गत झाला असेल, अशी शंका वर्तविली जात आहे. गरजूंना कामावर घेतल्या जात नाही, कारण तो आपल्या मर्जीतला नसल्याने डावलल्या जातो व त्याच्याऐवजी बोगस नावे टाकून पैसा लाटल्या जात असल्याने या योजनेला अधिकाऱ्यापासून ते लहान कर्मचाऱ्यापर्यंत भ्रष्टाचाराची मोठी किड लागली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कामावर न घेतलेल्या मजुराने तक्रार केल्यास त्याच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. (प्रतिनिधी)