तालुका क्रीडा संकुलातील कामांच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:28 AM2021-05-19T04:28:59+5:302021-05-19T04:28:59+5:30
राजुरा येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामाला जवळपास १० वर्ष पूर्ण झाले आहे. आजही येथील अनेक कामे प्रलंबित आहेत. सध्या ...
राजुरा येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामाला जवळपास १० वर्ष पूर्ण झाले आहे. आजही येथील अनेक कामे प्रलंबित आहेत. सध्या लांब उडी मैदान निर्मिती व अन्य दुरूस्तीचे कामे करण्यात येत आहे. या कामांच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येते. लांब उडीच्या मैदानाचे बांधकाम सुरू असून मैदानाचे काम करताना अंदाजीत १० मीटर लांब, ३ मीटर रूंद व १ मीटर उंच असे रेती भरण्यासाठी टाकी सारखे भिंतीचे बांधकाम करण्यात आले. परंतु भिंतीच्या मजबुतीसाठी कुठेच सिमेंट काँक्रीटचे पिल्लर किंवा कॉलम घेण्यात आले नसल्याने भिंतींना पायाभूत आधार नाही. काहीच दिवसात एका पावसामध्ये ही भिंत कोसळून पडली. त्याच कामात कोणतीही सुधारणा न करता परत जुन्याच विटा वापरून भिंतीचे नव्याने बांधकाम केले जात आहे. संकुलात सुरू असलेल्या दुरूस्तीच्या कामात अत्यंत कमी दर्जाचे साहित्य वापरण्यात येत आहे. या कामात कंत्राटदार व संबंधित अभियंत्याकडून गैरव्यवहार होत असून कामांच्या गुणवत्तेवर संशय निर्माण होत आहे. यामुळे सर्व कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पाठविण्यात आली आहे.