वैद्यकीय सुविधा पुरविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:50+5:302021-04-28T04:30:50+5:30
चंद्रपूर : चंद्रपुरात कोरोना अनियंत्रित झाला आहे. याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर पडला आहे. बेडअभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत ...
चंद्रपूर : चंद्रपुरात कोरोना अनियंत्रित झाला आहे. याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर पडला आहे. बेडअभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. तर काही रुग्णांवर उपचारासाठी राज्याबाहेर जाण्याची बिकट परिस्थिती आली. त्यामुळे येथे उत्तम वैद्यकीय सुविधा पुरवाव्या, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेत भारताचे संविधान देत त्यांचे स्वागत केले. तसेच यावेळी कोरोना रुग्णांवर योग्य उपचार व्हावा, यासाठी विविध मागण्याही त्यांनी केल्या आहे. या प्रसंगी खासदार बाळू धानोरकर, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, भद्रावती - वरोरा विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २०२० पर्यंत सुरू होणे अपेक्षित होते. मात्र या कामात दिरंगाई होत आहे. त्याकडे लक्ष देत हे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या, आंदोलनकर्त्या कोरोना योद्धाचे वेतन अदा करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.