जिवती येथे राष्ट्रीयीकृत बँकेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:29 AM2021-07-27T04:29:55+5:302021-07-27T04:29:55+5:30
काळी-पिवळीवरील प्रवासी विनामास्क घोसरी : पोंभुर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहेत. याकडे ...
काळी-पिवळीवरील प्रवासी विनामास्क
घोसरी : पोंभुर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहेत. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोंभुर्णा तालुक्यातील नांदगाव-गोंडपिपरी, नवेगाव मोरे-पोंभुर्णा, पोंभुर्णा-मूल या मार्गावरून क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक सुरू आहे.
भद्रावती, राजुरा येथे संग्रहालय उभारा
राजुरा : जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावतीनगरी व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे. या भागातील अनेक ऐतिहासिक पाऊलखुणा आहेत, त्याचे जतन होईल.
आवळगाव ते कोसंबी रस्त्याची दुरवस्था
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दैना झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत आहेत. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
सिंदेवाही : परिसरात वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक शासकीय कामे खंडित होत आहेत, याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. सध्या पावसाळा असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.
ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर
पोंभुर्णा : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्ती योजना यामुळे असफल होत आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.
बाराजारातील कचरा हटविण्याची मागणी
गडचांदूर : येथील रेल्वे फाटकाजवळ असलेला कचरा डेपो बंद करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मागील काही दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने समस्या ‘जैसे थे’ आहे.
नळयोजनांना तांत्रिक अडचणीचे ग्रहण
ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांत नळयोजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु, या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नसल्याने ग्रामीण नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागांत सर्रास सुरू असून, जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
प्रवासी वाहनातून नियमांचे उल्लंघन
घोसरी : पोंभुर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांतील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहेत. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोंभुर्णा तालुक्यातील नांदगाव-गोंडपिपरी, पोंभुर्णा-चंद्रपूर मार्गावर हा प्रकार सुरू आहे.
वढोलीत पांदण रस्त्याची दैनावस्था
वढोली : बोरगाव पुलाकडून निघणारा ताराचंद कोपुलवार ते विश्वनाथ चुदरी यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पांदण रस्त्यावर खड्डेमय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य व मोठे खड्डे तयार झाले असून, अवागमन करणाऱ्यांना त्रास होत आहे. या समस्येकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
केरोसीनअभावी अडचण वाढली
जिवती : केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र, केरोसीन बंद झाल्याने अडचण होत आहे. केरोसीन पुरविण्याची मागणी आहे.
येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा
कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.